वाहन उद्योगाला सवलतींनी सावरले

नवी दिल्ली, दि. ४ – गेल्या काही महिन्यांपासून मंदी, चढे व्याजदर, इंधन भाववाढ यासारख्या आव्हानांना तोंड देणार्‍या वाहन क्षेत्रासाठी जून महिना लाभदायक ठरला आहे. इंधनाच्या दरात वाढ केल्यामुळे चिंतेत असलेल्या वाहन उत्पादकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वापरलेली सवलतींची शक्कल कामाला आली आहे. यामुळे जून महिन्यात वाहन उद्योगाला सावरले असून, अनेक कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे.

’मारुती’ची विक्री झेपावली
देशातील सर्वात मोठी मोटार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीची विक्री जूनमध्ये २०.३० टक्क्यांनी झेपावली आहे. या महिन्यात कंपनीने ९६,५९७ मोटारींची विक्री आहे. जूनमध्ये देशांतर्गत विक्रीत १९.३० टक्क्यांनी, निर्यात २७.१३ टक्क्यांनी वाढली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

`ऑडी’च्या विक्रीत ७६ टक्क्यांची वाढ
जर्मनीमधील आलिशान मोटारी तयार करणार्‍या ऑडीने जूनमध्ये ७१८ मोटारींची विक‘ी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विक‘ीने ७५.९८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. वाढलेले इंधनाचे दर, महागाई, कर्ज वितरणातील घट आणि रुपयाची घसरण होत असतानाही झालेली ही वाढ उत्साहवर्धक असल्याचे कंपनीचे प्रमुख मायकल परश्चेके यांनी सांगितले.

ह्युंदाई मोटारच्या विक्रीत वाढ
मोटार उत्पादक ह्युंदाई मोटारने जूनमध्ये ५४,३५४ मोटारी विकल्या. यामध्ये अवघी ३.४९ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या महिन्यात कंपनीने ५२,५२१ मोटारींची विक्री केली होती.

जनरल मोटर्सची विक्री वधारली
जनरल मोटर्स इंडियाच्या जूनमधील विक्रीत ११ टक्क्यांनी वाढली असून, ७,३६४ मोटारींची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने ८,२४२ मोटारींची विक्री केली. बाजारात असलेल्या मंदीचा फटका विक्रीला बसला असून, सणासुदीपर्यंत तरी यात सुधारणा होण्याची अपेक्षा नसल्याचे कंपनीचे भारतातील उपाध्यक्ष पी. बालेंद्रन यांनी म्हटले आहे.

फोर्ड इंडियाची विक्री घटली
मोटार उत्पादक फोर्ड इंडिया जूनमध्ये ७,२८१ मोटारींची विक्री केली असून, यात २१.२० टक्क्यांची घट झाली आहे. कंपनीच्या विक्रीत घट झाली असली, तरी दीर्घकाळात देशातील वाहन उद्योग भरारी घेईल, अशी आशा कंपनीचे देशातील अध्यक्ष मायकल बोनेहॅम यांनी व्यक्त केली.

टोयोटाच्या विक्रीतही २२ टक्क्यांची वृद्धी
टोयोटा किर्लोस्करतही जून महिन्यात २२ टक्क्यांची वाढ झाली असून, १४,७०० मोटारींची विक्री केली. पेट्रोलच्या किमती कमी केल्यानंतर ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपव्यवस्थापकीय संचालक संदीप सिंग यांनी सांगितले.

महिंद्रा अँड महिंद्राच्या विक्रीत वाढ
प्रमुख मोटार उत्पादक महिंद्राने जूनमध्ये ४१,३२२ मोटारींची विक्री केली. यामध्ये १६.१२ टक्क्यांची वाढ झाली. गेल्या वर्षी कंपनीने ३५,५८४ मोटारींची विक्री केली होती. प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्येही २३ टक्क्यांची वाढ झाली. निर्यातही ३१ टक्क्यांनी वाढली.

टाटांची विक्रीही थंडावली
स्थानिक मोटार उत्पादक टाटा मोटर्सची विक्री थंडावली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने ६४,३४१ मोटारींची विक्री केली. यामध्ये पाच टक्क्यांची घट झाली. व्यावसायिक वाहनाची विक्री चार टक्क्यांनी घटली.

`व्हीई’च्या विक्रीत वाढ
व्होल्वो आणि आयशर या कंपन्यांचा संयुक्त उद्यम असलेल्या व्हीई मोटरच्या जूनमधील विक्रीमध्ये ९.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. या महिन्यात कंपनीने ४,०६४ वाहनांची विक्री केली.

`निसान’ची विक्री दुप्पट
निसान मोटार इंडियाच्या मोटार विक्रीमध्ये जून महिन्यात दुपटीने वाढ झाली आहे. या महिन्यात कंपनीने तब्बल ४,१६७ मोटारींची विक्री केली. जून २०११ मध्ये कंपनीने १,६३२ मोटारी विकल्या.

`फोक्सवागेन’च्या विक्रीत घट
आलिशान मोटारींची निर्मिती करणार्‍या फोक्सवागेनच्या विक्रीत जूनमध्ये किरकोळ घट झाली. या महिन्यात कंपनीने ५,३७१ मोटारींची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात ५,३९७ मोटारींची विक्री करण्यात आली होती.

मोटारसायकलींची मागणी वाढली
मोटारींबरोबरच बाजारात मोटारसायकलींची मागणीही कायम आहे. इंधन भाववाढीचा फारसा परिणाम न झालेल्या मोटारसायकल उत्पादक कंपन्यांच्या विक्रीत जूनमध्येही चांगली वाढ झाली. बजाज आणि टीव्हीएस वगळता जवळपास सर्वच कंपन्यांच्या विक्रीमध्ये वृद्धी झाली.

हीरोमोटो कॉर्पची पाच लाख विक्री
मोटारसायकल उत्पादक हीरोमोटो कॉर्पने जून महिन्यात ५,३४,०९१ मोटारसायकलींची विक्री केली. यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत चार टक्क्यांची वाढ झाली. गेल्या वर्षी कंपनीने ५,१२,२४४ मोटारसायकलींची विक्री केली होती.

’होंडा’ची विक्री जोरात
होंडा मोटारसायकलच्या जूनमधील विक्रीमध्ये ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. या महिन्यात कंपनीने २,२६,८६४ मोटारसायकलींची विक्री केली. मोटारसायकल विक्रीमध्ये ४७ टक्के आणि स्कूटरच्या विक्रीमध्ये ५७ टक्क्यांची वाढ झाली.

`टीव्हीएस’च्या विक्रीला ब्रेक
टीव्हीएस मोटारच्या जूनमधील विक्रीमध्ये घट झाली आहे. या महिन्यात कंपनीने १,६५,४८३ मोटारसायकलींची विक्री केली. जून २०११ मध्ये कंपनीने देशभरात १,८२,४५६ मोटारसायकलींची विक्री केली होती.

बजाज ऑटोची विक्री घटली
बाइक निर्मिती करणार्‍या बजाज ऑटोची विक्री १.३८ टक्क्यांनी घटली आहे. जूनमध्ये कंपनीने ३,१८,३७७ मोटारसायकलची विक्री केली. गेल्या वर्षी कंपनीने ३,२२,८२७ मोटारसायकलींची विक्री केली होती. निर्यातीमध्येही घसरण झाली आहे.

वाहन सुरक्षेविषयी नवीन धोरण
वाहन उद्योगाची संघटना असलेल्या `सियाम’ने सोमवारी सदोष वाहनांतील त्रुटी दूर करण्यासाठी धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार जर संघटनेच्या सदस्याकडून कोणतीही हयगय झालेली आढळल्यास त्यांच्याविरोधात सरकारने कारवाई करण्याची शिफारस सियामने केली आहे. सरकार वाहन क्षेत्रासाठी कोणते धोरण लागू करू इच्छित असेल तर त्याचे स्वागतच असून, या धोरणाची चाचपणी सुरू असल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सियाम)ने म्हटले आहे. हे विकासाबरोबरच सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने आणखी एक पाऊल ठरणार असल्याचे सियामचे अध्यक्ष एस. शांडिल्य यांनी सांगितले. दुचाकी ते व्यावसायिक वाहने अशा सर्वासाठीच हे धोरण लागू होणार असून, सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असलेला वाहनांमधील दोष कंपनीला स्वखर्चाने दूर करावा लागणार आहे.