
औरंगाबाद, दि. ४ – सिडकोतील वाढती पाणी टंचाईने आता नगरसेवकांनाच लाईनमनचे काम करण्यास भाग पाडले असून एन-७ सिडकोतील पाण्याच्या टाकीवर एन-१ ते ७ भागांतील नगरसेवकांनी हा प्रकार सुरु केला आहे.

औरंगाबाद, दि. ४ – सिडकोतील वाढती पाणी टंचाईने आता नगरसेवकांनाच लाईनमनचे काम करण्यास भाग पाडले असून एन-७ सिडकोतील पाण्याच्या टाकीवर एन-१ ते ७ भागांतील नगरसेवकांनी हा प्रकार सुरु केला आहे.
जायकवाडी येथून होत असलेला शहरासाठीचा पाणी पुरवठा दिवसेंदिवस कमी कमी होत चालल्याने त्याचा फटका शहरातील सिडको व पुंडलिकनगर भागाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. सिडकोतील एन-१ ते एन-७ पर्यंतच्या भागाला पाणी पुरवठा हा एन-७ येथील पाण्याच्या टाक्यातून केला जातो. यासाठी एन-१ भागाकरिता १ जलकुंभ असून, एन-२ ते ५ पर्यंतच्या परिसरासाठी १ जलकुंभ आहे. एन-७ परिसरासाठी एक जलकुंभ आहे. हे तीनही जलकुंभ दररोज एका विशिष्ट पातळीपर्यंत भरले जावे, असे नियोजित केलेले आहे.
मात्र पाणीच मुळात कमी येत असल्याने जलकुंभाची पाणी पातळी (लेव्हल) नियोजित पातळी गाठत नाही. यामुळे अनेक वॉर्डांना २ ते ३ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. या त्रासामुळे आपल्या पाण्याच्या टाकीची पातळी जास्त व्हावी, यासाठी आता त्या त्या नगरसेवकांनी चक्क पाण्याच्या टाकीवर जाऊन इतर वॉर्डांतील पाण्याच्या टाकीत सोडले जाणारे पाणी बंद करुन आपल्या वॉर्डांला ज्या टाकीद्वारे पाणी पुरवठा होतो त्या टाकीचा व्हॉल्व्ह सुरु करीत आहे. यास विरोध करणार्या लाईनमन व टाकीच्या कर्मचार्याला मारहाणीची धमकी दिली जात आहे. त्यामुळे हे कर्मचारी देखील हातावर हात ठेवून बसत आहे. जो टाकीवर जाईल व व्हॉल्व्ह सुरु करेल, त्याच्याच वॉर्डांला पाणी मिळेल, असा प्रकार सुरु झाला आहे. या सर्व प्रकाराचा फटका मात्र सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.