नवी दिल्ली,-विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचा मोठा विरोध असतानाही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २००४ मध्ये पंतप्रधान पदाचे निमंत्रण देण्याची सर्व तयारी राष्ट्रपती कार्यालयाने केली होती. सोनिया गांधी यांना पंतप्रधान म्हणून निमंत्रित करण्याचे पत्रही तयार करण्यात आले होते, अशी माहिती तत्कालिन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे. कलाम यांच्या या माहितीमुळे त्यावेळी घडलेल्या घडामोंडीवर नव्याने प्रकाश पडला आहे.
सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उचलून धरत कलाम यांनीच त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखले होते, अशी माहिती आतापर्यंत काही राजकीय पक्षांच्या हवाल्याने माध्यमांमधून पुढे आली होती. त्यावेळी बराच वाद निर्माण झाला होता. परंतु, हा खुलासा करुन कलाम यांनी त्यावेळी घडलेल्या नाट्यावरुन पडदा उचलला आहे.
’टर्निग पॉईंटस’ या नव्या पुस्तकामध्ये कलाम यांनी त्यावेळेस घडलेल्या घडामोडींबद्दल सविस्तर विवेचन केले आहे. हे पुस्तक त्यांच्या ’विंग्स ऑफ फायर’ची दुसरी आवृत्ती आहे. या पुस्तकातील काही माहिती एका इंग्रजी वृत्तपंत्राने प्रसिद्ध केली आहे.
लोकसभेच्या २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर सोनिया गांधी आपल्याला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रपती कार्यालयाने त्यांना पंतप्रधान म्हणून निमंत्रित करण्यासाठी पत्रही तयार केले होते.
जर त्यावेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान बनण्याचा दावा केला असता, तर घटनेतील तरतुदींप्रमाणे माझ्याकडे त्यांना नियुक्त करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता, असे कलाम यांनी म्हटले आहे. मात्र, त्यानंतर १८ मे २००४ रोजी ज्यावेळी पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांना निवडण्यात आले, त्यावेळी मला मोठे आश्चर्य वाटले, असेही कलाम यांनी लिहिले आहे.
या घटनेनंतर राष्ट्रपती कार्यालयाला सोनिया गांधी यांचे नाव वगळून डॉ. मनमोहनसिंग यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केल्याचे नवे पत्र तयार करावे लागले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
विविध राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी आपल्याला समर्थन दिले असल्याची पत्रे सोनिया गांधी यांनी मला दाखविली होती. त्यानंतरच राष्ट्रपती कार्यालयाने त्यांना पंतप्रधान म्हणून निमंत्रित करण्याची तयारी केली होती, असे कलाम यांनी स्पष्ट केले.