सरबजितसाठी सलमानची मोहीम

पाकिस्तानच्या तुरुंगात कैदेत असलेल्या सरबजित सिंग यांच्या सुटकेसाठी आता बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान पुढे सरसावला आहे. सलमानने ट्विटरवर मोहीम सुरु केली आहे. त्यातून त्याने पाकिस्तानी जनतेला अल्लाहच्या नावाने भावनिक आवाहन केले आहे.

सलमानने अनेक ट्विटस करुन एक मोहीम सुरु केली आहे. तो म्हणतो, `मी पाकिस्तानची जनता, प्रसार माध्यमे, सरकार आणि राष्ट्रपती झरदारी यांना सरबजितवर दयेसाठी विनंती करतो.
 
३० वर्षांनंतर सरबजितला घरी परत पाठविणे एक चांगला संदेश ठरेल. मला आशा आहे की पाकिस्तानची जनता मला पाठींबा देईल आणि एक कुटुंबाच्या आंनदात सहभागी होईल. सरबजितसाठी ट्विट करण्याची माझी अनेक दिवसांपासून इच्छा होती. सरबजितच्या बहिणीचे एक छायाचित्र मी पाहिले. ते पाहून मला अतिशय वेदना झाल्या. माझी मदत करा, त्यांची मदत करा, ‘ असे टिवटस सलमानने केले आहेत.

आता जरी सलमानने अल्लाहचा वास्ता देऊन सरबजितसाठी मदतीचे आव्हान केले असले तरी त्याच्या या ट्विटचा संबंध थेट ’एक था टायगर’च्या प्रमोशनसोबत लावला जात आहे. सलमानने ’एक था टायगर’ चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका केली आहे. दरम्यान, सल्लूने ट्विट कोणत्याही कारणाने केले असले, तरी त्याचे परिणाम काय होतात याकडे सर्व भारतीयांचे लक्ष आहे.