नीतीमूल्य बदलल्याने मसाला चित्रपट हिट ठरतात – प्रकाश झा

चित्रपट माध्यम हे समाजमनाचे प्रतिबिंब असते. बदलत्या अर्थकारणाबरोबरच सामाजिक नीतीमूल्ये बदलत जातात. गुरु-शिष्यांचे नाते हे अतिशय पवित्र नाते आहे. मात्र, आज संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे व्यावसायीकरण घडले आहे, यातुन जीवनाची मूल्ये बदलली आहेत, याचा परिणाम म्हणून वास्तववादी, सामान्य माणसाचे जगण मांडणार्‍या चित्रपटाच्या तुलनेने `दबंग’, `राउडी राठौड’सारखे मसाला चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात, असे मत चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांनी व्यक्त केले.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या वतीने आयोजित कार्यक्रमात झा बोलत होते. चित्रपट लेखक अंजुम ब्रजबली, अनिता भास्कर, एफटीआयआयचे संचालक डी. जे. नारायण, कुलसचिव प्रकाश मगदुम आदी यावेळी उपस्थित होते.
झा म्हणाले, व्यवसायिक चित्रपटांपेक्षा कलात्मक आणि वास्तववादी चित्रपट बनवायला मला आवडतात, ते चित्रपट मी अधिक चांगल्या पद्धतीने एंजॉय करतो. आज सामाजिक नीतीमूल्ये बदलली आहेत याला चित्रपट व्यवसायही अपवाद राहिलेला नाही.  गंगाजल -२, राजनिती -२, सत्याग्रह आणि चक्रव्युव्ह या चित्रपटांवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

चक्रव्युव्ह हा नक्षलस्त भागातील वास्तव पडद्यावर साकारणारा आहे. राजनिती चित्रपटामधून भारतीय राजकारणाचा मागोवा घेतल्यानंतर आता राजनिती -२च्या माध्यमातून मध्यमवर्गीय भारतीयांच्या मानसिकतेचा वेध घेण्यात आला आहे. मध्यमवर्ग एखाद्या विषयाचे समर्थन करतो, मात्र प्रत्यक्ष कृतीची वेळ आली म्हणजे त्या विषयावर माघार घेतो किंवा विरोधीकृतीमध्ये सामील झालेला असतो, यावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे झा यांनी सांगितले.