बंगळुरू दि.३०- मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्या जागी येडियुरप्पा यांचे निष्ठावंत जगदीश शेत्तार यांना मुख्यमंत्री करावे, या मागणीसाठी आठ मंत्र्यांनी दिलेले राजीनामे आपण स्वीकारणार नाही, असे मुख्यमंत्री गौडा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.
मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारण्यास मुख्यमंत्री गौडांचा नकार
गौडा यांनी या पार्श्वभूमीवर राज्यपाल हंसराज भारद्वाज यांची भेट घेऊन राजकीय परिस्थितीची त्यांना कल्पना दिली. येडियुरप्पा निष्ठ आठ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. कर्नाटकातला पेच म्हणजे चहाच्या कपातले वादळ असून लवकर हा प्रश्न सुटेल, असे मत भाजप पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केले. दरम्यान येडियुरप्पा गटाचे आणखी दोन मंत्री शोभा करंडल्जे आणि राजू गौडा मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश हे तातडीने बंगळुरूला आले असून त्यांनी सदानंद गौडा यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली असल्याचे सूत्रांनी सांगितले . सतिश यांनी पक्षश्रेष्ठींचा संदेश मुख्यमंत्र्यांसाठी आणला असून मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घेऊन मार्ग काढावा व पक्षश्रेष्ठींचा त्याला पाठिबा असेल, असे संदेशात कळविले आहे.
कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष ईश्वरप्पा म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारावेत. ज्या आठ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, त्या पैकी बेलमागी यांचा अपवाद वगळता बाकीचे सर्व मंत्री हे लिंगायत समाजातील आहेत.
