कोलकत्यात मेडिकल कॉलेजमध्ये स्फोट;१ जखमी

कोलकता दि.३० – येथील नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटात एक जण जखमी झाल्याची माहिती कॉलेजमधील सूत्रांनी दिली.  आरोग्य विभागाने या स्फोटाच्या चौकशीचे आदेश दिले असून, रविवारपर्यंत अहवाल मागितला आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री चंद्रीमा भट्टाचार्य म्हणाले, मेडिकल कॉलेजमध्ये साफसफाईचे काम सुरू असताना स्फोट झाला. या स्फोटात साफसफाई करणारा कर्मचारी जखमी झाला असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट नेमका कशाचा झाला हे समजू शकलेले नाही. घटनास्थळी बाँब शोधक व नाशक पथक दाखल झाले आहे. मेडिकल कॉलेज परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे.

मेडिकल कॉलेजचे प्राचार्य सिद्धार्थ चक्रवर्ती म्हणाले, सफाई कर्मचार्‍याला एक हिरव्या रंगाचे पाकीट आढळून आले. त्याने ते हातात घेऊन फेकून दिले, त्यावेळी पाकिट खांबाला आदळल्यानंतर स्फोट झाला.

Leave a Comment