इंटरनेट महागणार

नवी दिल्ली दि.२९- इंटरनेटचा वापर करणार्‍यांसाठी ही बातमी निराशाजनक आहे कारण १ जुलैपासून टेलिकॉम विभागाने इंटरनेट सेवा पुरवठादारांसाठी परवाना शुल्क शून्यावरून चार टक्कयांवर नेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे तसेच हे शुल्क १एप्रिल २०१३ पासून दुप्पट म्हणजे ८ टक्के करण्यात येणार आहे. याचा थेट परिणाम इंटरनेट वापरणार्‍यांवर होणार असून त्यांच्या इंटरनेट बिलांत लक्षणीय वाढ होणार आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार इंटरनेट सर्व्हीस प्रोव्हायडर व इंटरनेट सर्व्हीस टेलिफोनी या दोन्ही सेवांसाठी आजपर्यंत वेगवेगळे परवाना शुल्क आकारले जात होते. आयएसपीसाठी शुल्क नव्हते तर इंटरनेट टेलिफोनी साठी सहा टक्के परवाना शुल्क आकारणी करण्यात येत होती. मात्र महसूल वाढीसाठी या दोन्ही सेवांसाठीचे शुल्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ती अमेंडमेंटही नियमांत करण्यात आली आहे. ही दुरूस्ती करताना दोन्ही सेवांसाठीचे परवाना शुल्क समानच असावे असा निर्णय झाल्याने १ जुलैपासून इंटरनेट सेवा पुरवठादारांना चार टक्के परवाना शुल्क द्यावे लागणार आहे तर आयएसपी आयटी साठी हे शुल्क सध्याच्या सहा टक्कयांवरून सात टक्क्यांवर नेण्यात येत आहे. मात्र १ एप्रिल २०१३ पासून दोन्ही सेवांसाठी ८ टक्के शुल्क आकारले जाणार आहे.

यामुळे डायल अप अथवा ब्रॉडबँड अशी कुठलीही सेवा वापरणार्‍या ग्राहकांच्या महिन्याच्या फोन बिलात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.