युरो कप – रोनॉल्डोकडे देशाचा हिरो बनण्याची संधी

दोनेत्स्क (युक्रेन) दि.२६ – पोर्तुगाली कर्णधार क्रिस्टियानो रोनॉल्डो आणि लियोन मेसी यांच्यात श्रेष्ठतावरुन वाद सुरुच राहील, पण या दोन्ही खेळाडूंचे रेकॉर्ड सांगते , मेसी आपला क्लब बार्सिलोनासाठी चांगली कामगिरी करतो, तर अर्जेंटीनी संघाकडून खेळताना तो तेवढा उत्कृष्ट खेळत नाही. हीच स्थिती रोनॉल्डोची आहे. तो स्पॅनिश क्लब रीयल माद्रिदकडून शानदार कामगिरी करतो तर पोर्तुगालसाठी खेळताना अपयशी ठरतो.

परंतु यूरो चषकात पोर्तुगालला उपांत्य फेरीत पोहोचवणार्‍या रोनॉल्डोने हा समज खोटा ठरवत सिद्ध केले आहे की, मोठ्या स्पर्धेतही तो आपल्या बळावर संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरतो. सुरुवातीच्या सामन्यात गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्यानंतर पुनरागमन करत रोनॉल्डोने आपली महानता सिद्ध केली आहे. रियल माद्रिदचा स्टार खेळाडू रोनॉल्डोने युरो चषकातील चार सामन्यात तीन गोल केले आहेत चार सामन्यात तो दोनवेळेस ’सामनावीर’ ठरला आहे. उपांत्य फेरीत पोर्तुगालचा सामना गत चॅम्पियन स्पेनविरुद्ध बुधवारी होईल.

२००८ युरो चषकात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रवास करणार्‍या पोर्तुगाल संघासाठी रोनॉल्डोने फक्त  एक गोल केला होता. २०१० विश्वचषकातही तो एकच गोल करू शकला होता. आठ वर्षापूर्वी युरो चषकात ग्रीसच्या हातून जेतेपद गमावल्यानंतर हा स्टार खेळाडू आपले अश्रू लपवू शकला नव्हता. त्यावेळीही तो विशेष काही करु शकला नव्हता, परंतु यावेळी रोनॉल्डोची कामगिरी पाहता त्याच्याकडे पोर्तुगालचा पहिला यूरोपियन चॅम्पियन बनण्याची सुवर्णसंधी आहे.