नागपुरातून आंतरराष्ट्रीय पंच घडावेत – सावंत

नागपूर, दि. २६ – नागपूर शहराने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले आहे. आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉनच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्पर्धाही नागपुरात व्हायला लागल्या आहेत. मात्र आता देशांतर्गत व विदेशातही होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शहरातून पंच घडावेत, अशी आजची अपेक्षा असल्याचे मत भारतीय ऍथेलेटिक्स महासंघाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र ऍथेलटिक्स संघटनेचे महासचिव प्रल्हाद सावंत यांनी केले.

नागपूर जिल्हा ऍथेलेटिक्स संघटना व धनवटे महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे ऍथेलेटिक्स पंच संमेलनचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यांत्रिकी युगात आज सर्व मोठ्या प्रमाणात स्पर्धा या इलेक्ट्रॉनिक्स उपक्रमाच्या सहाय्याने आयोजित करण्यात येतात. त्यासर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना हाताळणारे व यंत्रवत अचूक निर्णय घेणार्‍या पंचांची मोठी आवश्यकता आहे. त्यासाठी नागपूरकर ऍथेलेटिक्स पंचांनी तयार रहावे असेही ते म्हणाले. येत्या काही वर्षात महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणार आहे. त्यात पुणे, मुंबई, नागपूर आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन याच्यासह एशियन ग्रँड प्रिक्स ऍथेलेटिक्स या सर्व स्पर्धांचे नेटके व अचूक आयोजनासाठी शारीरिक व मानसिक दृष्टीने तंदुरुस्त असणार्‍या युवा पंचांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. नागपुरात पी.एच.डी. प्राप्त शारीरिक शिक्षण प्राध्यापक मोठ्या संख्येने या क्षेत्रात येत असल्याने ही समाधानाची बाब असल्याचे मत सावंत यांनी व्यक्त केले. राज्य संघटनेतर्फे एक मोठी कार्यशाळा नागपुरात करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

ऍथेलेटिक्स पंच संमेलनात प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे अध्यक्षस्थानी होते, तर जिल्हा ऍथेलेटिक्स संघटनेचे विश्‍वसत विशाल मुत्तेमवार व प्रा. अविनाश पातनावणे प्रामुख्याने अतिथी म्हणून उपस्थित होते. २०११-१२ या वर्षात झालेल्या ऍथेलेटिक्स पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५२ पंचांना प्रल्हाद सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. देशातील नागपूर हे मोठी आंतरराष्ट्रीय मॅरेथानचे व्यासपीठ आहे असे मत विशाल मुत्तेमवार यांनी व्यक्त केले.