अंदमानच्या विमानतळावर झळकल्या स्वा. सावरकरांच्या काव्यपंक्ती

मुंबई, दि. २६ – भारताच्या स्वातंत्र्यसंग्राम काळात अंदमान बेटावरील स्वातंत्र्यवीर सावरकर (पोर्ट ब्लेअर) आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दर्शनी भागात विमानतळ प्राधिकरणातर्फे स्वा. वि.दा.सावरकर यांचा अर्धपुतळा व काव्यपंक्ती कोरलेली कोनशीला बसविण्यात आली आहे.   

ब्रिटीशांविरूद्ध भारतीयांनी पुकारलेल्या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना अंदमान व निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे असलेल्या सेल्यूलर तुरूंगात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जात. मात्र तरीही या स्वातंत्र्यसैनिकांच्या मनात असलेली स्वातंत्र्याची उर्मी कधीच कमी झाली नाही. स्वा. सावरकर हे सशस्त्र भारतीय क्रांतीचे अग्रणी नेते. स्वा. सावरकर व त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांना याच बेटावर जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी आणले होते. या दोघा बंधूंचे या बेटावरील वास्तव्य हे त्यांच्या चरित्रातच नव्हे, तर भारतीय इतिहासातही अतिशय महत्वाची घटना समजली जाते. या स्मृतीप्रित्यर्थ पोर्ट ब्लेअर आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वा. सावरकरांचे नाव दिले गेले.

काही वर्षांपूर्वी कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री मणीशंकर अय्यर यांनी येथील सावरकर स्मारकावर दिमाखाने झळकत असलेल्या सावरकरांच्या काव्यपंक्ती तेथून हटविण्याचे आदेश दिले. सावरकरप्रेमी व राष्ट्रभक्त नागरिकांमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. देशभरातून अय्यर यांचा निषेध करण्यात आला होता.

या पार्श्‍वभूमीवर मुंबईच्या स्वा.सावरकर राष्ट्रीय स्मारकाने काही महिन्यांपूर्वी पोर्ट ब्लेअर विमानतळ प्राधिकरणाला सावरकरांचा अर्धपुतळा भेट दिला होता. तो यावेळी विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळील दर्शनी भागात स्थापन करण्यात आला आहे, असे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.