प्रणवदांना पाठिंब्यासाठी सपाची आर्थिक मागणी

नवी दिल्ली दि. २६ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ममता बॅनजींर्च्या पावलांवर पाऊल ठेवले आहे. ममतांप्रमाणेच अखिलेश यांनीही केंद्राकडे उत्तर प्रदेशसाठी मोठ्या पॅकेजची मागणी केली आहे. अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली असे खात्रीलायक वृत्त आहे.

समाजवादी पार्टीने केंद सरकारला पाठींबा दिला आहे. आता राष्ट्रपती निवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवाराला समाजवादी पार्टीने पाठींबा जाहीर केला आहे. परंतु, या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशसाठी एका मोठ्या पॅकेजची मागणी केली आहे. तब्बल ९० हजार कोटी रुपयांचे पॅकेज अखिलेश यांनी मागितले आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारीला ममत बॅनजींर्नी कडाडून विरोध केला. त्यात मुलायम सिंह यादव यांनीही साथ दिली. परंतु, ऐन मोक्याच्या क्षणी मुलायम यांनी ममतांना झटका देऊन काँग्रेसला साथ दिली. यामागे एखादे डील झाल्याची चर्चा होती. आता पॅकेजची चर्चा सुरु आहे. परंतु, अखिलेश यादव यांनी हे वृत्त फेटाळले आहे.

अखिलेश यादव यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही पॅकेजची मागणी केलेली नाही. उत्तर प्रदेशमध्ये केंद्र सरकारच्या अनेक योजना सुरु आहेत. अनेक योजनांना केंद्राचे अनुदान मिळत आहे. या योजनांमध्ये केंद्राकडून देण्यात येणारा निधी अद्याप मिळालेला नाही. तोच निधी आम्ही मागितला आहे. अखिलेश यादव यांनी अशा योजनांची यादीच दिली.

पॅकेजच्या चर्चेनंतर आता समाजवादी पार्टी युपीए मध्ये सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसला ममता बॅनर्जी यांच्यापासून सुटका करुन घ्यायची आहे. त्यामुळे ममता बाहेर पडल्यास सपाचा पाठींबा काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave a Comment