प्रणवदांना निरोप – काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला दिग्विजय सिंहांची दांडी

नवी दिल्ली, दि. २५ – काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) सोमवारी झालेल्या बैठकीला पक्षाचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी दांडी मारली. राष्ट्रपतीपदाचे यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना अधिकृत निरोप देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य अधिकृत नसल्याचे काँग्रेसने जाहीर केले होते. पक्षाच्या या भूमिकेवर ते नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे. तर दिग्विजय सिंह यांनी ते भोपाळ येथे असल्याचे सांगितले.

या बैठकीत पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रणवदांनी काँग्रेसला चार दशके योगदान दिले. त्याबद्दलचा प्रस्ताव यावेळी पारित करण्यात आला. मुखर्जी १९७८ मध्ये काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बनले होते. राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यूपीएचे उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीकडून त्यांना आज निरोप देण्यात आला. या निरोपामुळे काँग्रेस आणि प्रणवदांचे औपचारिक नाते आज संपुष्टात आले.

दुसरीकडे, प्रणवदा राष्ट्रपती झाल्यास ते अर्थमंत्रालयातील सल्लागार ओमिता पॉल यांना स्वीय सहाय्यक करतील, अशाही चर्चेने जोर धरला आहे.