श्रीनगर,दि. २५ – शिव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला आजपासून सुरवात झाली असली तरी पावसाच्या जोरदार आगमनामुळे हजारो यात्रेकरूंना थांबवण्यात आले आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर यात्रेकरूंना पुढे जाण्यास परवानगी देण्यात येईल. बालतालच्या निरीक्षण कक्षापासून अमरनाथपर्यंतच्या सुमारे १४ किलोमीटरच्या मार्गावर जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. पावसामुळे या मार्गावर मोठ्या अडचणी निर्माण झाल्याअसून पावसाचा जोर कमी झाल्याशिवाय यात्रेकरूंना पुढील टप्प्यापर्यंत सोडण्यात येणार नाही, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अधिकार्यांनी दिली आहे.
जोरदार पावसामुळे अमरनाथ यात्रा खोळंबली
पेहलगामच्या निरीक्षण कक्षातून २ हजार यात्रेकरूंना अमरनाथला पाठवण्यात आले असून जाताना त्यांना पेहलगामच्या पारंपरिक मार्गानेच पाठविण्यात आले आहे. अमरनाथला पोहोचण्यासाठी त्यांना चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन झाल्यावर त्यांना बालतालच्या मार्गाने परत आणण्यात येणार आहे.
या वर्षी यात्रेकरूंच्या सुरक्षिततेची व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. पेहलगामपासून जाणारा पारंपरिक रस्ता व बालतालचा रस्ता या दोन्ही रस्त्यांवरील बर्फ हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, जोरदार पावसाने व खराब हवामानामुळे यात्रेत अडथळा येत आहे. अशी स्थिती असताना देखील हेलिकॉप्टरच्या मदतीने ६० यात्रेकरू अमरनाथला पोहोचले आहेत, त्यांच्यासमवेत काश्मीरचे राज्यपाल व देवस्थान मंडळाचे अध्यक्ष एन. एन. व्होरा हेही अमरनाथ मंदिरात दाखल झाले आहेत. त्यांच्या हस्ते अमरनाथ येथील शिवलिंगाचे सकाळी पूजन करण्यात आले.
