प्रणव मुखर्जी २८ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

नवी दिल्ली, दि. २४ – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा २६ जूनला राजीनामा दिल्यानंतर प्रणव मुखर्जी २८ जून रोजी राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

तमिळनाडूतील चेन्नई येथून ते ३० जूनपासून प्रचारास प्रारंभ करतील. मुंबई आणि अन्य भागांत ते दुसर्‍या टप्प्यात जाणार आहेत. 

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत आहे. मुखर्जी यांच्या नावाने उमेदवारी अर्जांचे चार संच भरले जाणे अपेक्षित आहे. एका अर्जावर प्रस्तावक व अनुमोदक म्हणून प्रत्येकी पन्नास आमदार-खासदारांच्या सह्यांची गरज असते.

आतापर्यंत मुखर्जी यांना सत्तारूढ ‘यूपीए’ सरकारमधील तृणमूल कॉंग्रेस वगळता बाकी सर्व घटक पक्षांचा पाठिंबा मिळालेला आहे. कॉंग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, मुस्लिम लीग, राष्ट्रीय लोकदल इत्यादी आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार्‍यांमध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय जनता दल, लोकजन शक्ती पक्ष यांचा समावेश आहे, तर आघाडीबाहेरच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक तसेच विरोधी भाजप आघाडीमधील शिवसेना आणि संयुक्त जनता दल (जेडीयू) यांचाही पाठिंबा त्यांना जाहीर झालेला आहे.