आपण दबाव सहन करण्यास सक्षम – विष्णू वर्धन

नवी दिल्ली, दि. २२ – आपण कोणत्याही दबावाखाली नसून, आपल्याला २०११ साली झालेल्या आशियाई सामन्यांमध्ये सानिया मिर्झासोबत खेळण्याचा अनुभव आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेमध्येही आपण लिएंडर पेससोबत चांगला खेळ करू, असा विश्‍वास ऑलिम्पिकसाठी पेसचा साथीदार म्हणून निवड झाल्यानंतर विष्णू वर्धन याने व्यक्त केला. आपण २०१० साली च्वांगझ्याहु इथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये सानिया मिर्झासोबत खेळताना दबावाखाली होतो. त्यामुळे दबाव कसा हाताळायचा हे आता आपल्याला व्यवस्थित उमगले आहे, असे विष्णूने सांगितले.

ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने (एआयटीए) ऑलिम्पिक स्पर्धेसाठी गुरूवारी भारतीय टेनिसच्या दोन पुरूष दुहेरी संघांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये महेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांचा आणि लिएंडर पेस आणि विष्णू वर्धनचा असे दोन संघ घोषित करण्यात आले. बुधवारी पेसने आपल्याला जर कमी मानांकनाच्या खेळाडूसोबत खेळणे भाग पडणार असेल, तर आपण ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार नसल्याचा इशारा दिला होता.

पेसने अखिल भारतीय टेनिस संघटनेशी काय बोलणे केले आहे, याबद्दल आपल्याला काहीही कल्पना नाही. त्याबद्दल आपल्याला काही ऐकायचेही नाही, असे विष्णू म्हणाला. आपण पेसच्या साथीने अद्याप कोणतेही सामने खेळलेलो नाही. पण डेव्हिस चषकादरम्यान आपण त्याच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. आम्ही एकमेकांसोबत सोबत घालविला वेळ संस्मरणीय असून पेस आपल्याला मदत करण्यासाठी नेहमी वेळ काढतो. आम्ही सतत एकमेकांच्या संपर्कात असतो असेही विष्णू म्हणाला.