हवाई दलातील संधी

air

प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये काही तरी वेगळे करण्याची मनिषा बाळगून असतो. त्यातल्या त्यात शूरवीरांच्या कथा ऐकून आपणही देशासाठी काही तरी केले पाहिजे, अशी भावना तरुण वयामध्ये प्रबळ असते आणि त्यादृष्टीने लष्करामध्ये बर्‍याच सुवर्णसंधी उपलब्धही असतात. मात्र सर्व तरुणांपर्यंत या संधीची माहितीही पोचत नाही आणि त्यांना योग्य मार्गदर्शनही होत नाही. त्यामुळे लष्कराच्या तिन्ही दलातील अधिकार्‍यांच्या अनेक जागा रिकाम्या असतात. लष्करातील अधिकार्‍यांच्या वेतनाबाबत काही तरी भेदभाव होत आहे, अशी चर्चा सहाव्या वेतन आयोगाच्या घोषणेच्यावेळी सुरू झाली होती आणि या भेदभावामुळे करिअर माईंडेड तरुणांचा लष्कराकडे ओढा कमी आहे असे लक्षात आले होते.

भारतीय लष्करातल्या रिकाम्या जागांचे तपशील सुद्धा प्रसिद्ध झाले होते आणि त्यामुळे बरीचशी चिंताही व्यक्त करण्यात आली होती. नंतर मात्र या गोष्टीची दखल घेऊन लष्कराकडे करिअरीस्ट तरुण-तरुणी आकृष्ट होतील असे काही बदल करण्यात आले. त्यामुळे आता तरुणांची इकडे वळायला काही हरकत नाही. ज्या तरुणांना लष्करात काम करण्याचा थरार अनुभवायचा असेल त्यांनी हवाई दलात अवश्य दाखल व्हावे. पदवीधर तरुणांना हवाई दलात एअरमन किंवा अधिकारी म्हणून दाखल होता येते. अधिकारी पदावर काम करणार्‍यांना डावपेच आखणे, व्यवस्थापन करणे आणि नेतृत्व करणे अशी कामे करावी लागतात. तर एअरमन म्हणून काम करताना या सर्व कामांसाठी आवश्यक असलेली सहाय्यभूत कामे करता येतात.

अधिकारी म्हणून उत्साही तरुण आणि समर्पणशील भावनेने काम करणार्‍या उमेदवारांचे अर्ज हवाईदलाकडून मागविले जात असतात. अर्ज केल्यानंतर काही प्राथमिक चाचण्या घेऊन योग्य उमेदवारांची निवड केली जाते आणि त्यानंतर मात्र अशा उमेदवारांना हवाई दलाच्या विविध तळांवर दिल्या जाणार्‍या अतिशय कठीण अशा प्रशिक्षणातून जावे लागते. त्यानंतर त्यांना कमिशन अधिकारी म्हणून हवाई तळावर नेमले जाते. हवाई दलामध्ये खालीलपैकी कोणत्याही एका शाखेमध्ये भरती होऊन या नोकरीतला चित्तथरारक अनुभव घेता येतो आणि आपले करिअर निर्माण करता येते. फ्लाईंग ब्रँचमध्ये प्रत्यक्ष उड्डाण करण्याची आणि कठीणात कठीण अशा युद्धात सहभागी होण्याची संधी मिळते.

अर्थात टेक्निकल ब्रँचमध्ये असे आव्हानात्मक काम नसले तरी त्या आव्हानात्मक कामासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सोयी उपलब्ध करण्यासाठी काम करावे लागते. या कामासाठी काही तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले असणे गरजेचे असते. पदवीधरांना हवाई दलात भरती होताना तीन प्रकारच्या परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेतून उत्तीर्ण व्हावे लागते. कंम्बाईंन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन या परीक्षेतून लष्करात भरती होता येते. ही परीक्षा संघ लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाते आणि ती उत्तीर्ण होणार्‍यांना भारतीय हवाई दलाच्या फ्लाईंग ब्रँचमध्ये संधी दिली जाते. या परीक्षेतून येणार्‍या विद्यार्थ्यांना परमनंट कमिशन दिले जाते.

हवाई दलात भरती होण्यात दुसरा मार्ग म्हणजे एन.सी.सी. (नॅशनल कॅडेट कॉर्पस्). या दलाची सिनिअर डिव्हिजन सी सर्टिफिकेट परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अर्ज करता येतो. यामध्ये उमेदवाराला हवाई दलाच्या फ्लाईंग ब्रँचमध्ये थेट अर्ज करता येतो. पुरुषांना या मार्गाने अर्ज केल्यानंतर फ्लाईंग ब्रँचच्या परीक्षा द्याव्या लागतात आणि त्या उत्तीर्ण झाल्यास परमनंट कमिशन मिळते. या परीक्षा देण्याकरिता विद्यार्थ्याकडे खालील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. त्याचे वय १९ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे, तो अविवाहित असावा, भारतीय असावा आणि पदार्थ विज्ञान आणि गणित हे दोन विषय घेऊन त्याने कोणतीही पदवी मिळवलेली असली तरी चालेल. अगदी या दोन विषयाचे ज्ञान असणारा बी.ई. पदवीधर सुद्धा या परीक्षेला अर्ज करू शकतो.

लष्करातील जवानांना आणि अधिकार्‍यांना उत्तम वेतन दिले जाते. अनेक सुविधा पुरविल्या जातात, निवृत्ती वेतन दिले जाते आणि कमिशनची मुदत संपल्यानंतर इतरत्र नोकरी करण्याची इच्छा असेल तर अनेक शासकीय-निमशासकीय नोकर्‍यांमध्ये प्राधान्य दिले जाते. पराक्रम गाजवण्याची इच्छा असणार्‍या आणि होतकरू तरुणांना भारताचे हवाई दल खुणावते आहे. करिअर करतानाच देशभक्तीच्या भावनेची परिपूर्ती करण्याची ही एक संधी आहे.

Leave a Comment