पेट्रोल कार उत्पादकांनी उत्पादन घटविले

पुणे दि.२०- पेट्रोलची दरवाढ, वाढती महागाई आणि ग्राहकांकडून घटलेली मागणी यामुळे कार उत्पादनातील अग्रणी टाटा मोटर्स, टोयोटो किलोस्कर, मारूकी सुझुकी आणि फियाट यांनी आपले पेट्रोल कारचे उत्पादन घटविले आहे. अर्थात हे उत्पादन तात्पुरत्या स्वरूपात कमी करण्यात आल्याचे या कंपन्यांचे म्हणणे असले तरी पूर्ण क्षमतेने उत्पादन पुन्हा कधी सुरू होणार याबाबत मात्र कांहीच ठोस माहिती देण्यास आलेली नाही.

पुण्यातील टाटा मोटर्सने या आठवड्यात त्यांच्या व्यावसायिक वाहनांचे उत्पादन तीन दिवस थांबविले आहे. त्यानुसार हा प्रकल्प दि.२२ ते २४ जूनपर्यंत बंद राहणार आहे. यासंबंधी अधिक माहिती देताना संबंधित विभागाचे अधिकारी म्हणाले की व्याजदरातील वाढ, खाणकाम आणि बांधकाम व्यवसायातील मंदी यामुळे त्यांच्या व्यावसायिक वाहनांची मागणी मे महिन्यात घटली असून त्यामुळे या वाहनांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. मे महिन्यात विक्रीत १५.८९ टकके घट आली आहे.  पेट्रोलच्या दरवाढीची झळ केवळ प्रवासी गाड्यांनाच नाही तर व्यावसायिक गाड्यांनाही बसली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मारूती उद्योगानेही पुढील महिन्यात एक आठवडा वाहन उत्पादन विभाग देखभाल आणि दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या महिन्यातही कंपनीने तीन दिवस अल्टो, एम ८००, एस्टीलो आणि ओम्नीचे उत्पादन थांबविले होते. मे महिन्यात मारूतीच्या कार विक्रीतही ८.४२ टक्के घट झाली आहे. टोयोटो किलोस्करचे व्यवस्थापकी संचालक शेखर विश्वनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल कारचा साठा पुरेसा आहे आणि डिझेल वाहनांची विक्री स्थिर आहे. मात्र डिझेल वाहनांसाठी आता प्रतीक्षा करावी लागत नाही त्यामुळे आता पेट्रोल कार विक्रीचे उत्पादन कांही काळ बंद ठेवावे असा आमचाही विचार सुरू आहे.

रांजणगांव येथे प्रकल्प असलेल्या फियाट उद्योगानेही पुढील महिन्यात दोन तीन दिवस कार उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या समुहाची टाटा मोटर्सची भागीदारी असल्याने त्यांचाही विचार यात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिन्यात फियाटच्या विक्रीत ५७.१३ टक्के घट आली आहे. गेले सात महिने सर्वच कंपन्यांच्या पेट्रोल कार विक्रीत घट झाल्याचेही सांगण्यात आले आहे.