विदेशी गुंतवणुकीत घट

मुंबई, दि. २० – अर्थव्यवस्थेतील मंदी व गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाल्याने देशातील गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे एप्रिल महिन्यात विदेशी गुंतवणुकीमध्ये ४१ टक्क्यांची घट झाली. या महिन्यात देशात केवळ १.८५ अब्ज डॉलरची गुंतवणुक  झाली आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता व देशातील रखडलेल्या आर्थिक धोरणांमुळे गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास धजावत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ३.१२ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली होती. गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी व गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविण्यासाठी सरकारने आर्थिक सुधारणांवर भर देण्याची आवश्यकता आहे. या आधीच स्टँडर्ड अँड पूअर्स व फिच या पतमानांकन संस्थांनीही देशाच्या पतमानांकनात घट केली होती. यामुळे गुंतवणूक आणखी कमी झाली आहे.

एप्रिलमध्ये सेवाक्षेत्रात ४४ कोटी ९० लाख डॉलर, औषध निर्माणक्षेत्रात ३५ कोटी ९० लाख डॉलर, बांधकामक्षेत्रात १२ कोटी डॉलर व  ऊर्जाक्षेत्रामध्ये सहा कोटी ८० लाख डॉलरची गुंतवणूक झाली. या महिन्यातही मॉरिशसमधून सर्वाधिक ६३ कोटी ३० लाख डॉलरची गुंतवणूक झाली आहे.