रशियाचे अध्यक्ष पुतीन लंडन ऑलिंपिक्सला हजेरी लावणार !

रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन हे ब्रिटनमध्ये तब्बल नऊ वर्षांनी जाणार असून तेथे होत असलेल्या लंडन ऑलिंपिक्स मधील ज्युडो स्पर्धांना ते उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे असे त्यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कीव्ह यांनी सांगितले आहे.

याविषयीची अधिक माहिती अशी की मेक्सिकोत होत असलेल्या जी २० शिखर परिषदेत पुतीन आणि इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरॉन यांची भेट झाली. पुतीन स्वतः ज्युडोचे ब्लॅक बेल्ट विनर आहेत. त्यांनी कॅमरॉन यांना ऑलिंपिक्स स्पर्धा यशस्वी पार पडाव्या यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच लंडन भेटीचा आपला विचारही सांगितला. अर्थात हा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे.

रशिया आणि ब्रिटन या दोन देशांतील संबंध २००६ पासून बिनसलेले आहेत. ललेंक लेटविस्को या माजी रशियन हेराची विष प्रयोग करून हत्या झाल्यानंतर हे संबंध बिघडले आहेत कारण ब्रिटनने या हेराचा खुनी असलेल्या माजी केजीबी सुरक्षा रक्षकाचे हस्तांतरण करण्याची विनंती रशियाला केली होती मात्र रशियाने ती फेटाळली. पुतीन यांचे अनेक विरोधक आणि शत्रू यांना ब्रिटनने आश्रय दिला आहे. ब्रिटनचे राजकीय नेते व माजी युरोप मंत्री डेनिस मॅक्शेन यांनी तर पुतीन यांनी मानव हक्कांचे उल्लंघन केले असल्याने त्यांचे ऑलिंपिक्स स्पर्धेत  स्वागत होणे अवघड असल्याचे सांगितले आहे.