रथयात्रेसाठी जगन्नाथपुरी सज्ज

जगन्नाथ पुरी दि.१९- उद्यापासून म्हणजे दि.२० पासून २२ तारखेपर्यंत पुरीत जगन्नाथ रथयात्रेचा सोहोळा पार पडत असून या सोहळ्यासाठी जगन्नाथ,बलराम आणि सुभद्रा पूर्ण स्वस्थ म्हणजे ठणठणीत झाले आहेत. वाचून थोडे नवल वाटते काय? पण मग हे कळायलाच हवे. जगभरात ज्या रथयात्रेचे कुतुहल जनमानसात आहे, त्या जगन्नाथ रथयात्रेअगोदर १५ दिवस देव दरवर्षी आजारी असतात.ज्येष्ठी पौर्णिमेपासून सुरू होणारा हा आजार रथयात्रा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी पूर्ण बरा झालेला असतो. वर्षातून एकदाच या देवांचा स्नान समारंभ होत असल्याने हे स्नान झाले की देवांना थंडी,ताप भरतो. मग पंधरादिवस मंदिराची दारे बंद होतात आणि देव विश्रांती घेतात.

मंदिरातील पुजारी गौरीशंकर शृंगारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या पंधरा दिवसांत देवांना दशमुलारिष्टासारखी आयुर्वेदिक औषधे देण्यात येतात.तसेच झाडांच्या मुळांपासून बनविलेल्या खास पुनरी तेलाने मालिश करण्यात येते. या देवस्थानात ३६ विभाग असून प्रत्येकाकडे कांही ना कांही जबाबदारी सोपविलेली असते आणि ही परंपरेने सुरूच राहते. देवांना औषधे देण्याचे काम करणार्‍यांना दैत्य पुजारी असे ओळखले जाते आणि हे आयुर्वेदातील तज्ञ असतात. देवांना सजविणारे असतात शृंगारी पुजारी. देवांच्या आजारपणाच्या काळात मूळ मूर्ती हटवून तेथे प्रतिकृती बसविल्या जातात आणि येणार्‍या भक्तांना दरवाजाला असणार्‍या छिद्रातून देवदर्शन करता येते पण त्यासाठी पैसे मोजावे लागतात.

इतकेच नव्हे तर ज्यावर्षी जून जुलै महिन्यात अधिक महिना येतो तेव्हा देवांना स्वर्गारोहणही करावे लागते. हा सोहळा १६ वर्षांपूर्वी पार पडला होता आणि आता २०१५ साली तो पुन्हा साजरा होईल. देवांनी स्वर्गारोहण केलेले असल्याने तेथे समाध्याही बांधण्यात आल्या असून त्यांची काळजी घेणार्‍यांना अघोरी असे ओळखले जाते. या सोहळ्यानंतर नवीन मूर्तींची स्थापना केली जाते आणि या मूर्ती बनविण्याचा अधिकार आहे विश्वकर्मा समाजाकडे.

आपल्याकडे भग्न अथवा खंडित मूर्ती पुजल्या जात नाहीत मात्र या मंदिरातील मूर्तींना कान,पाय आणि हाताचे पंजे नाहीत तसेच डोळ्यांना पापण्या नाहीत. त्यामागे अशी कथा सांगितली जाते की विश्वकर्मा या मूर्ती बनवित असताना कुणीही आत डोकावायचे नाही असे बजावले गेले होते. मात्र कांही जणांनी कुतुहलाने मूर्तींचे काम कुठवर झाले हे पाहण्यासाठी खोलीत डोकावले व त्यामुळे मूर्ती अर्धवटच सोडून विश्वकर्मा अदृष्य झाले.
 
रथयात्रेसाठी पुरी आता तयार झाले असून आत्तापासूनच लाखो भाविक या ठिकाणी जमा होऊ लागले आहेत. २० ते २२ दरम्यान होणारा हा सोहळा पाहण्यासाठी सर्वच जण आतूर असून अनेक परदेशी पर्यटकांनीही त्यासाठी पुरी गाठली आहे. चार किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील रथयात्रेचा आनंद सर्वांनाच लुटता यावा यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.