दक्षिणेतला दणका

दक्षिण भारत विशेषत: कर्नाटक आणि आंध्र ही दोन राज्ये म्हणजे कॉंग्रेसचे बालेकिल्ले होते. १९७७ साली इंदिरा गांधी यांना आणीबाणीचे बक्षीस म्हणून जबरदस्त राजकीय हादरा बसला होता. उत्तर भारतातल्या नऊ राज्यात त्यांच्या पक्षाला लोकसभेची एक सुद्धा जागा मिळाली नव्हती. परंतु आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांनी हात दिल्यामुळे लोकसभेतली कॉंग्रेस पक्षाची संख्या दीडशे पर्यंत जाऊ शकली होती. कॉंग्रेसचा आणि आंध्र प्रदेशाचा संबंध तसा निकटचा आणि दिलासा देणारा आहे. १९८३ साली मात्र एन.टी. रामाराव यांच्या रुपाने कॉंग्रेसच्या वर्चस्वाला तिथे चांगलाच हादरा बसला. कर्नाटकात रामकृष्ण हेगडे यांनी सुद्धा कॉंग्रेसचे वर्चस्व संपवले. मात्र दहा वर्षांनी या दोन्ही राज्यात कॉंग्रेसची स्थिती सावरली गेली होती. कर्नाटकात बंगारप्पा यांनी आणि आंध्रमध्ये राजशेखर रेड्डी यांनी कॉंग्रेसला पुन्हा सत्तेच्या जवळ आणले होते. परंतु कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या वर्चस्ववादी भूमिकेमुळे या दोन्ही राज्यात कॉंग्रेसची सद्दी संपली आहे. आंध्रमध्ये तर राजशेखर रेड्डी यांच्या मुलानेच कॉंग्रेसला नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांत आसमान दाखवले आहे.

आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभेच्या १७ आणि लोकसभेच्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाला केवळ एक जागा मिळवता आली. कॉंग्रेसचा हा दारूण पराभव पाहिल्यानंतर या राज्यामध्ये कॉंग्रेसला या पुढच्या काळामध्ये काही स्थान राहणार आहे की नाही, असा प्रश्‍न निर्माण होतो. तेलंगणाच्या प्रश्‍नामुळे कॉंग्रेसने तेलंगणातले आपले वर्चस्व गमावले आहे. तिथे गेल्या दोन वर्षांमध्ये विविध निमित्तांनी अनेक पोटनिवडणुका झाल्या, परंतु त्या प्रत्येक पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. एकंदरीत तेलंगण भागामध्ये कॉंग्रेसला आता तरी पाय ठेवायलाही जागा नाही. तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीने कॉंग्रेसचे स्थान धोक्यात आणले आहे. कारण तेलंगण भागातील लोकांच्या तेलंगण राज्य निर्मितीविषयीच्या भावना फार तीव्र आहेत. परंतु आंध्र प्रदेशाच्या उर्वरित म्हणजे रायलसीमा आणि कोस्टल आंध्र प्रदेश या दोन भागांमध्ये तेलंगणाच्या मागणीवरून नेमकी उलटी भावना आहे. त्यामुळे तेलंगण हातचे गेले तरी या दोन भागात तरी कॉंग्रेसला काही धोका पोचणार नाही, असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत होते. परंतु या दोन्ही भागात कॉंग्रेसची धोबीपछाड झाली आहे.

या भागात झालेल्या १९ पोटनिवडणुकांपैकी १६ पोटनिवडणुका वाय.एस.आर. कॉंग्रेसने जिंकल्या आहेत.  कॉंग्रेसच्या हाती फक्त दोन जागा आल्या. तेलंगण राष्ट्र समितीने तेलंगणातली एक जागा जिंकली, परंतु त्या जागेवर वाय.एस.आर. कॉंग्रेसचा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. म्हणजे तेलंगणामध्ये तेलुगू देसम आणि  कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर रहावे लागणार आहे.  कॉंग्रेसची अवस्था तर दयनीय झाली आहेच पण तेलुगू देसमला सुद्धा फार आशा वाटाव्यात अशी स्थिती नाही. एकंदरीत तेलुगू देसम नावाचा पक्ष आता  कॉंग्रेस-सारखाच मागे पडत चाललेला आहे. तेलंगणा भागामध्ये या दोन्ही पक्षांना तेलंगणास केलेला विरोध महागात पडत चालला आहे. कारण या दोन्ही पक्षांनी तेलंगणाच्या बाबतीत नेहमीच संधीसाधू भूमिका घेतली आहे. सुरुवातीला तेलंगणाला विरोध, निवडणुकांत तेलंगणाचा ढोंगीपणाने केलेला पुरस्कार आणि नंतर अगदीच गळ्याशी आल्यास तेलंगणाला दिलेली मान्यता असे या दोन्ही पक्षांचे धोरण राहिले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तेलंगणाच्याही लोकांचा विश्‍वास राहिलेला नाही आणि उर्वरित आंध्र प्रदेशातल्या लोकांनाही त्यांच्याविषयी आस्था राहिलेली नाही. सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये तेलंगणास तेरास आणि उर्वरित आंध्र प्रदेशात वाय.एस.आर.कॉंग्रेसने वर्चस्व निर्माण केले आहे.

कॉंग्रेसवर ही परिस्थिती का आली? याचा विचार केला पाहिजे. केवळ आंध्रच नव्हे, तर इतरही अनेक राज्यांमध्ये कॉंग्रेसला आपले जुने वर्चस्व टिकवता आलेले नाही. कॉंग्रेसच्या नेत्यांनी राज्य पातळीवरच्या स्वयंभू आणि प्रतिभावान नेत्यांना कधीही वरचढ होऊ दिलेले नाही. त्याचा एक भाग म्हणून राज्य स्तरावरच्या नेत्यांचे खच्चीकरण केले आणि प्रादेशिक भावनांचा नेहमीच अवमान केला. त्यामुळे प्रादेशिक भावना बलवत्तर असलेली जनता कॉंग्रेसपासून फटकून रहायला लागली. तामिळनाडूमध्ये याच भावनेतून द्रमुकचा उदय झाला. १९६७ साली द्रमुकने तिथे सत्ता मिळवली तेव्हापासून कॉंग्रेसला तामिळनाडूत द्रमुकचा सहकारी दुय्यम पक्ष म्हणून काम करावे लागत आहे. केरळमध्येही अशीच अवस्था आहे. कॉंग्रेसच्या हातात सत्ता आहे खरी, परंतु ती मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या नाकदुर्‍या काढणे भाग पडते. आंध्र प्रदेशामध्ये त्यांनी आमदारांच्या भावना विचारात घेऊन जगनमोहन रेड्डी यांना मुख्यमंत्री केले असते, त्याचबरोबर तेलंगणाच्या भावना विचारात घेऊन तेलंगणाची निर्मिती केली असती तर कॉंग्रेसवर ही स्थिती आली नसती.