२०१४ पर्यंत मनमोहनसिंग हेच पंतप्रधान : कॉंग्रेस

नवी दिल्ली, १५ – पंतप्रधानपदी कोणताही बदल केला जाणार नाही, २०१४ पर्यंत मनमोहनसिंग हेच पंतप्रधान राहतील, असे स्पष्टीकरण गुरुवारी कॉंग्रेसने दिले. तृणमूल कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाने बुधवारी केलेल्या मागणीनुसार डॉ. मनमोहनसिंग यांना पंतप्रधान पदावरून हटवणे शक्य नाही आणि माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम तसेच लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांची राष्ट्रपतीपदासाठी सुचवलेली नावे कॉंग्रेसला मान्य नाहीत, असे कॉंग्रेस प्रवक्ते जर्नादन द्विवेदी यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. परंतु, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. घटक पक्षांसोबत चर्चा करून मुखर्जी यांना पाठिंबा मिळवण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. गुरुवारी सकाळी प्रणव मुखर्जी, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आणि संरक्षणमंत्री ए. के. अँथनी यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सायंकाळी मनमोहनसिंग सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर कॉंग्रेसच्या कोर कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत नाव निश्चित होईल असे समजते.

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदासाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची नावे सुचवली होती. परंतु तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंग यांनी या दोघांची नावे फेटाळून लावली. याबाबत गुप्तता पाळण्याऐवजी ममतांनी बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी नावे उघड केली. त्यामुळे सोनिया गांधीसोबत झालेल्या बैठकीतील चर्चा ममतांनी जगजाहीर करून त्यांनी मर्यादेचे उल्लंघन केल्याचा आरोप द्विवेदी यांनी केला आहे.

दरम्यान सकाळी प्रणव मुखर्जी यांनी सोनिया गांधींची १० जनपथवर भेट घेतली मात्र अद्यापही राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांची नावे निश्चित झालेली नाहीत, नावांवर अजूनही चर्चा सुरू असून प्रणव मुखर्जींना यांच्या नावाला द्रमुकने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांनीही आपण कॉंग्रेससोबतच असल्याचे जाहीर केले आहे. तर, समाजवादी पार्टीने प्रणव मुखजीं सपाचा विरोध नसून सोनिया गांधींनी आम्हाला चर्चेला बोलावले तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे म्हटले आहे. राष्ट्रपतीपदाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार दुपारनंतर सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचे समजते. त्यामुळे शरद पवार कोणती भूमिका घेतात याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment