पुणे दि.१४ – संत तुकाराम आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालख्या पुण्यात मुक्कामासाठी विसावलेल्या असतानाच हडपसर येथील माहिती तंत्रज्ञान हबमधील सुरक्षा प्रमुखांना अज्ञात पत्र मिळाले असून यांत पुण्यात कांही महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हाताने लिहिलेल्या या पत्रात कांही दहशतवादी प्रचंड स्फोटकांच्या साठ्यासह पुण्यात यापूर्वीच आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पत्राची शहर पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतली असून सुरक्षा बंदोबस्तात वाढ केली आहे.
या पत्रात नमूद करण्यात आल्याप्रमाणे कोरेगांव भागातील ओशो आश्रम, कोरेगांव पार्क प्लाझा, हार्ड रॉक, ओकवुड हॉटेल, वेस्ट इन हॉटेल आणि मगरपट्टा भागातील कांही आय.टी कंपन्यांत बॉम्बस्फोटा करण्याचे कारस्थान रचले गेले आहे. हे पत्र कदाचित बनावटही असू शकेल मात्र पोलिसांनी त्याबाबत गंभीर दखल घेऊनच कार्यवाही सुरू केली असल्याचे सहआयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी स्पष्ट केले आहे. हे पत्र कुठून आले त्याचाही तपास घेण्यात येत आहे. सिघल आणि अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी या पत्राची माहिती मिळताच त्वरीत हडपसर पोलिस स्टेशनचे प्रमुख वरीष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांची भेट घेतली आहे आणि त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत असेही समजते.
पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव म्हणाले की पुण्यात संतांच्या पालख्या मुक्कामाला आहेत. या पालख्या उद्या हडपसर मार्गेच पुढे जाणार आहेत. शहरात वारी निमित्ताने आलेल्या लाखो वारकर्यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची असून सर्वप्रथम त्यांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आय.टी.कंपन्या आणि इतर हल्ला होऊ शकणार्या अन्य संभाव्य स्थळांच्या प्रमुखांना बोलावून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासंबंधी माहिती दिली गेली आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात पुन्हा बॉम्बस्फोटांची शक्यता असल्याचे कांही धागे त्यांना यापूर्वीच मिळाले आहेत आणि पुणे स्थानिक पोलिसांबरोबर झालेल्या बैठकीत या माहितीची देवाणघेवाणही करण्यात आली आहे. पोलिसांनी हडपसरच्या मगरपट्टा सिटीत मॉक ड्रील केली असून कांही घरांच्या झडत्याही घेण्यात आल्या असल्याचे समजते.