वारकरी वारीबरोबरच सामाजिक प्रश्नांतही सक्रीय

पुणे दि.१४- गेली कांही वर्षे वारकरी संघटना दरवर्षीच्या वारीप्रमाणेच कांही सामाजिक आणि राजकीय चळवळीत सहभागी होताना दिसत असून काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टोलनाक्यांविरोधात दिलेल्या इशार्‍याअगोदरच वारकरी संघटनांनी टोल बूथ संदर्भात निदर्शने केली आहेत. इतकेच नव्हे तर पुणे नगर रोडवरील पेरणे टोल नाका १५ जुलैपूर्वी बंद झालाच पाहिजे असा इशाराही राज्य शासनाला त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच आंदोलन करून दिला होता. या आंदोलनाचे नेतृत्त्व बंडातात्या कराडकर यांनी केले होते.

वारकर्‍यांनाही सामाजिक प्रश्नांची जाण आहे आणि त्यांची एकसंघ ताकदही फार मोठी असून आम्हाला शासनाने गृहित धरू नये असे या वारकरी संघटनांचे म्हणणे आहे. आपली ताकद आम्ही वेळोवेळी दाखवूच असा इशारा देताना नुकताच कोंढवा येथे खासगी कत्तलखाना सुरू करण्याचा पुणे मनपाचा प्रस्ताव या वारकरी संघटनांनी हाणून पाडला आहे हे विसरता येणार नाही.

वारकर्‍यांचा एक गट अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सक्रीय आहे. तर देहू आळंदी येथील वारकरी संघटनांनी इंद्रायणी प्रदूषण विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. समाजाची सेवा करण्याची शक्ती आणि इच्छा आमच्यातही आहे आणि आम्ही आमच्या नेत्यांचे आदेश पाळतो असे या संघटनांतील वारकर्‍यांचे म्हणणे आहे. आमच्या एकसंघ सामर्थ्याच्या वापर राजकीय लोकांनी करण्याचा प्रयत्न करू नये असेही त्यांचे सांगणे आहे. अलिकडे कांही वारकरी नेते त्यांच्या आंदोलनांना राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सातार्‍याचे वारकरी आबा कोंडे यांनी केला आहे. ते म्हणतात, सरकारने अंधश्रद्धा विरोधी कायदा आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत त्याला वारकर्‍यांचा विरोध आहे. अर्थात आम्ही अंधश्रद्ध नाही पण हा कायदा नक्की काय आहे ते आम्हाला समजावून सांगितले गेले पाहिजे.

वारकर्‍यांच्या आंदोलनाला राजकीय स्वरूप येण्याची सुरवात झाली ती २००८ च्या डाऊ विरोधी आंदोलनातून. चाकण येथील डाऊ केमिकल्स या कंपनीच्या प्रकल्पाला वारकर्‍यांनी एकजूटीने विरोध करून तो बंद पाडला मात्र तेव्हापासून खुले आम राजकीय पक्ष वारकर्‍यांच्या आंदोलनात सहभागी होऊ लागले आहेत असे दिसून येत आहे. पण त्यामुळे वारकरी संघटना निष्कारण राजकीय वादात ओढल्या जातात असेही कांही वारकर्‍यांचे म्हणणे आहे. महाबळेश्वर येथे २००९ साली झालेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रा.आनंद यादव यांना देऊ नये यासाठी वारकर्‍यांनी असेच आंदोलन छेडून यादव यांची निवड रद्द करणे भाग पाडले होते. यादव यांनी संत तुकारामांबाबत आक्षेपार्ह लिखाण केले असल्याचा आरोप करून वारकर्‍यांनी हे आंदोलन छेडले होते.

Leave a Comment