नदालचे किंमती घड्याळ परत मिळाले

पॅरिस दि.१४- फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विक्रमी सातवे विजेतेपद मिळविणार्‍या स्पेनच्या राफेल नदाल याचे चोरीस गेलेले अतिशय मूल्यवान असे घड्याळ परत मिळविण्यात पॅरिस पोलिसांना यश आले असून नदाल याने याबद्दल पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या संबंधीची सविस्तर हकीकत अशी की नदालने विक्रमी विजेतेपद मिळविल्यानंतर रिचर्ड मिल या महागडी घड्याळे बनविणार्‍या उद्योजकाने राफाला सुमारे ३.७५ लाख डॉलर्स किमतीचे हे घड्याळ भेट दिले होते. नदाल आपल्या कुटुंबियांसह ज्या हॉटेलात उतरला होता तेथून हे घड्याळ चोरी झाले. त्याची तक्रार पोलिसांत नोंदविण्यात आली होती. नदाल पुढच्या स्पर्धा खेळण्यासाठी सध्या जर्मनीत आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात नदालच्या खोलीची साफसफाई करणार्‍या कर्मचार्‍यानेच हे घड्याळ चोरल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला बुधवारी अटक करण्यात आली. या कर्मचार्‍यानेही चोरी कबूल करून स्वतःच्या घराजवळच्या रेल्वे ट्रेकजवळ पुरलेले हे घड्याळ पोलिसांना काढून दिले. नदालला घड्याळ सापडल्याची बातमी कळविली गेली तेव्हा त्याने पॅरिसच्या पोलिसांचे आभार तर मानलेच पण सबंधित हॉटेलबद्दलही आपली कोणतीही तक्रार नसल्याचे आणि यापुढेही तो याच हॉटेलात राहणार असल्याचेही सांगितले.

Leave a Comment