इराकमध्ये बॉम्बस्फोटांत ४४ ठार

बगदाद, दि. १३ – बुधवारी बगदादमध्ये शियापंथीयांना;  तर दक्षिण इराकमध्ये पोलिसांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांत ४४ जण ठार झाले. बगदादादमध्ये शियापंथीयांच्या एका महत्त्वपूर्ण धार्मिक सोहोळ्यात बॉम्बस्फोट घडविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आणि इस्पितळाच्या सूत्रांनी दिली.

बगदादमध्ये मोहम्मद पैगबरांचे नातू मूसा अल-काधिम यांच्या स्मृतिदिनानिमित्त शियापंथीय एकत्र जमले असताना त्या भागात चार बॉम्बस्फोट करण्यात आले. यामध्ये १८ जण ठार झाले. सांप्रदायिक हिंसाचार माजावा या हेतूने हे बॉम्बस्फोट घडविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दक्षिण इराकमधील हिला शहरात दोन बॉम्बस्फोट झाले. एका मोटारीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने त्या घटनेत २२ ठार; तर अन्य ३८ लोक जखमी झाले. शियापंथीयाची जास्त लोकवस्ती असलेल्या बलाड शहरातही दोन कार बॉम्बस्फोट घडविण्यात आले.  त्या घटनेत चौघांचा मृत्यू झाला.