दुसरी मुलगी जन्मल्यास महापालिका देणार आर्थिक मदत

मुंबई, दि. १३ – राज्यातील वाढत्या स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली असतानाच मुंबईतील स्त्री भ्रूण हत्यांचे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेने अनोखी मोहीम हाती घेतली आहे. दुसरी मुलगी जन्मल्यास त्या मुलीच्या पालकांना आर्थिक सहाय्य देण्याचा व दोन मुली असणार्‍या पालकांचा महापालिकेतर्फे सत्कार करण्याचा निर्णय मंगळवारी महापौर सुनिल प्रभू व आयुक्त सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.

स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी पालिकेने जनजागृती करावी; तसेच दुसरी मुलगी जन्मल्यास त्या मुलीच्या पालकांना आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या आ. नीलम गोर्‍हे यांनी महापौर सुनिल प्रभू यांच्याकडे मंगळवारी केली. यावेळी उपमहापौर मोहन मिठबावकर, अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष फाल्गुनी दवे आदी उपस्थित होते.

दरम्यान, पालिकेने मुंबईतील १३३९ सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी २४ विभागात वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. वैद्यकीय पथकाने ७० सेंटरची तपासणी केली असून त्रुटी आढळलेल्या पाच सेंटरना सील ठोकले आहे.

Leave a Comment