कराची, दि. १३ – पाकिस्तानचे सुप्रसिद्ध गझल गायक मेहदी हसन यांचे बुधवारी प्रदीर्घ आजाराने येथील एका रूग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ६ जून रोजी त्यांना आगाखान रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालविली. हसन यांच्या मागे नऊ मुलगे आणि पाच मुली असा परिवार आहे. त्यांनी दोन वेळा विवाह केला होता. त्यांच्या दोन्ही पत्नी याआधीच निवर्तल्या आहेत.
गझलगायक मेहदी हसन यांचा जन्म १८ जुलै १९२७ रोजी राजस्थानमधील झूंझूनू जिल्हयातील लुणा या गावात झाला होता. फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तानात स्थलांतर केले होते. मेहदी हसन यांनी गायलेल्या अनेक गझला प्रसिद्ध असून ’पत्ता पत्ता बुटा बुटा’, ’तडप ना मेरे दिल’, ’किसी की आस में’, ’कब के बिचारे’ आदी त्यांच्या गझला विशेष गाजल्या. गझल गायकीच्या क्षेत्रात मेहदी हसन हे गझलसम्राट म्हणून ओळखले जात.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांनी मेहदी हसन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संगीताच्या क्षेत्रात मेहदी हसन यांनी आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला होता, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मेहदी हसन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुखः व्यक्त केले आहे. गीतकार जावेद अख्तर म्हणाले की, मेहदी हसन यांच्या निधनामुळे गझल गायकीचे एक पर्व संपले आहे. मेहदी हसन यांनी गझल गायकीला एक वेगळे वळणच दिले नाही; तर नवा रंगही दिला. प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास म्हणाले की, मेहदी हसन आता आमच्यात नसले तरी त्यांचा आवाज शतकानुशतके आमच्यात राहील.