जर्मन बेकरी स्फोटामध्ये वापरले होते आर डी एक्स

पुणे, दि. ८ – पुण्यातील जर्मन बेकरीतील स्फोटामध्ये आरडीएक्स सारख्या अती ज्वलनशील स्फोटकासह अमेनियम नायट्रेट आणि ऑईलचे घटक मिळाले असल्याची माहिती दिल्ली येथील सेंट्रल फॉरेन्सिक सायंटिफिक लॅबोरेटरी येथील अग्निशस्त्रे आणि स्फोटके विशेष तज्ञ एम. बी. वर्धन यांनी न्यायालयात दिली.

जर्मन बेकरी येथे तेरा फेब्रुवारी २०१० रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीक्ष एन. पी. धोटे यांच्या न्यायालयात सुरु आहे. यावेळी एम. बी. वर्धन यांची साक्ष झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. प्रयोगशाळेत तपासणीसाठी येणारे पदार्थ हे सील करून येत असतात. या पदार्थांचे पृथ्थकरण किंवा तपासणी झाल्यानंतर ते आम्ही पुन्हा सील करून त्याबाबतचा अहवाल संबंधित तपास यंत्रणेकडे पाठवित असतो. पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाकडून प्रयोगशाळेत सात नमुने पाठविण्यात आले होते. या नमुन्यामध्ये आरडीएक्स, अमोनिया नायट्रेट आणि ऑईलचे घटक मिळाले होते. तसा अहवाल आपण यापूर्वीच दिला असून, त्यावर आपली स्वाक्षरी असल्याचेही त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले. आरडीएक्स हे अतीज्वलनशील स्फोटके असलेला पदार्थ असून त्याचा उपयोग प्रामुख्याने बॉम्ब तयार करण्यासाठीच केला जातो. स्फोटानंतर अमोनियम नायट्रेट आणि ऑईलमुळे त्याची तीव्रता वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, हस्ताक्षर तज्ञ अहिवळे यांचीही साक्ष झाली. पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून आपल्याला सात प्रकारची कागदपत्रे मिळाली होती. त्यात पॉकेट डायरी, एक पत्र, बँकेची पेमेंट स्लीप, गेस्ट हाऊसचे रजिस्टर यासह अन्य काही कागदपत्रांचा समावेश होता. या सर्व कागदपत्रांची मी तपासणी केली असल्याचे सांगून त्याबाबतचा अहवाल त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या न्यायालयात सादर केला.