माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना जन्मठेप

कैरो, दि. २  – इजिप्तचे माजी  राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठाविली आहे. मागील वर्षी इजिप्तमध्ये जनतेने जो उठाव केला होता त्यावेळी मुबारक राजवटीने केलेल्या अत्याचारात सुमारे ८५० निदर्शक ठार झाले होते. या हत्याकांडाबद्दल ८४ वर्षांचे होस्नी मुबारक यांना दोषी ठरविण्यात येऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा कैरोमधील एका न्यायालयाने दिली.

मुबारक यांचे सहकारी आणि माजी गृहमंत्री हबिब अल-अदली यांनाही जन्मठेप सुनावण्यात आली आहे. निदर्शकांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावरही ठेवण्यात आला होता. या खटल्यातून मुबारक यांचे दोन मुलगे गमाल आणि अला या दोघांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

अरब जगतात एखाद्या माजी राष्ट्रप्रमुखावर खटला भरण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे. शनिवारी निकाल सुनाविण्यासाठी होस्नी मुबारक यांना व्हिल चेअरमधून न्यायालयात आणण्यात आले. मुबारक यांना शिक्षा सुनावली जाताच न्यायालयात उपस्थित असलेल्यांनी एकच आरडाओरडा केला. न्यायालयाबाहेर जमलेल्या जनसमुदायास मुबारक यांना शिक्षा झाल्याचे कळताच त्यांनीही एकच जल्लोष केला. पण या खटल्यात माजी गृहमंत्र्यांच्या अन्य सहकार्‍यांना शिक्षा न झाल्याबद्दल जनतेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

मुबारक यांना शिक्षा सुनाविणारे न्या. अहमद रेफात म्हणाले की, मुबारक यांच्यावरील हा खटला दहा महिने चालला असून त्यांनी केलेल्या गुन्हयाबद्दल योग्य शिक्षा देण्यात आली आहे. मुबारक यांच्या राजवटीत देशातील जनता ३० वर्षे अंधारयुगातच लोटली गेली होती, असेही न्यायालयाने नमूद केले.