बंगलोर दि.३०- खाण घोटाळ्यात आपले मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेले येडियुरप्पा यांच्या नातीचा विवाह आज बंगलोर येथे होत असतानाच येडियुरप्पा समर्थकांनी भाजप वरीष्ठ नेत्यांना कर्नाटकच्या नेतृत्त्वावरून वेठीस धरण्याची योजना आखली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या विवाहसंमारंभाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि महासचिव अरूण जेटली उपस्थित राहणार आहेत.
कर्नाटकात आज रंगणार मानापमानाचे नाट्य
येडियुरप्पांनी त्यांच्या कार्यकाळात पंचायत राज मंत्री जगदीश शेट्टर हे पक्षातील दुसरे लिंगायत नेते म्हणून वर येऊ नयेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र आता येडियुरप्पा आणि त्यांचे समर्थक सध्याचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना हाकलून त्यांच्याजागी शेट्टर यांची नियुक्ती केली जावी यासाठी गडकरींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. तसा आग्रहच हे नेते धरणार आहेत असे समजते.
येडियुरप्पा यांना खाण घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यानंतर त्यांच्याच आग्रहानुसार गौडा यांना मुख्यमंत्रीपदी बसविले गेले होते. मात्र त्यावेळी सहा महिन्यात त्यांनी राजीनामा देणे येडियुरप्पांना अपेक्षित होते. सदानंद गौडा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला त्यामुळे त्यांनी दगाबाजी केली असा येडियुरप्पा आणि त्यांच्या समर्थकांचा ग्रह झाला आहे आणि त्यातूनच त्यांना लवकरात लवकर हटविले जावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सध्या कोणत्याही परिस्थितीत येडियुरप्पांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही हे लक्षात आल्यानंतर आता त्यांनी शेट्टर यांच्या नावाचा आग्रह धरला आहे आणि त्यामुळेच आज कर्नाटकात वादळी चर्चा होण्याची शक्यता तज्ञ वर्तवित आहेत. गौडांना धडा शिकविण्यासाठी येडियुरप्पांनी ही चाल खेळल्याची चर्चाही सुरू आहे.
