स्टीव्ह जॉब्ज द्रष्टा होता, मी त्याला पर्याय होऊ शकत नाही- टीम कुक

अॅपल या बलाढ्य कंपनीची धुरा आपल्या हाती घेतलेल्या टीम कुकने नुकताच सर्वाधिक पगार घेणारा सीईओ म्हणून लौकिक प्राप्त केला असतानाच वॉल स्ट्रीट जर्नलच्या वार्षिक परिषदेत आपल्या पहिल्या वहिल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्टीव्हची जागा कोणीच घेऊ शकत नाही असे सांगितले आहे. मी कधीच स्टीव्ह जॉब्जची जागा घेऊ शकणार नाही. तो खरा द्रष्टा होता. माझ्या नेतृत्त्वाखाली कसे बदल होणार हे मी आत्ता सांगू शकत नाही. मी जसा आहे, तसा आहे. अॅपलचा कार्यक्षम आणि चांगला सीईओ बनण्यावर मी माझे लक्ष केंद्रीत केले आहे असेही तो म्हणाला.

अॅपलच्या उत्पादनांबाबत आम्ही अधिक गुप्तता पाळण्याचा प्रयत्न करत आहोत असे सांगून कुक म्हणाला की अॅपल टिव्ही बाबत लोकांत खूप औत्सुक्य आहे. फेसबुकशी आमचे संबंध नेहमीच चांगले राहिले असून यापुढेही त्यात बदल होण्याचे कांही कारण नाही. अॅपल सॅमसंग पेटंटवरून पेटलेल्या कायदेशीर वादाबाबत कांहीही बोलण्यास त्याने नकार दिलाच पण पेटंट पायरसी याच्यावर मात्र त्याने भाष्य केले. तसेच अॅपल जगाचे डेव्हलपर नाही हे महत्त्वाचे असल्याचेही त्याने सांगितले.

Leave a Comment