रूपया घसरला तरीही भारताचे पतमानांकन शाबूत

मुंबई, दि. २९ – गेले दोन आठवडे डॉलरच्या तुलनेत रूपयाची झालेली विक्रमी घसरण याचा परिणाम भारताच्या पतमानांकनावर होणार नसल्याचे ’मूडी’ या पतमानांकन संस्थेने स्पष्ट केले आहे. मात्र, परदेशी कर्जाची उचल केलेल्या खाजगी कंपन्यांना याचा फटका बसू शकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सरकारच्या कर्जफेडीवरील रूपयाच्या अवमूल्यनाचा परिणाम मर्यादित आहे. रूपयाने ५६ च्याही खाली झेप घेतल्याने सरकार व रिझर्व्ह बँकेच्या अडचणी वाढल्या. मात्र, रूपयाच्या घसरणीने देशाच्या पतमानांकनाला कुठलाही धोका नसल्याचे, तसेच सध्याची रूपयाची घसरण १९९१ च्या तुलनेत कमी नुकसान करणारी असल्याचे ’मूडी’ने म्हटले आहे.