फेसबुकचा स्मार्टफोन पुढच्या वर्षात बाजारात?

संगणकावर बसून वेबसाईट पाहण्यापेक्षा मोबाईलवरच नेट कनेक्ट करणार्‍यांची वाढती संख्या लक्षात घेऊन सोशल साईट फेसबुकनेही त्यांचा व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने स्वतःचाच स्मार्टफोन पुढील वर्षापर्यंत बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

फेसबुकच्या बाजारात येत असलेल्या शेअर्सबाबत गुंतवणूकदारांत गोंधळाचे वातावरण असतानाच हा निर्णय जाहीर झाला आहे. फेसबुकने या कामी अॅपलमधून बाहेर पडलेले अर्धा डझन इंजिनिअर्सही कामावर घेतले असल्याचे वृत्त असून हे इंजिनिअर्स फेसबुकच्या मोबाईलसाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर तयार करणार आहेत. पुढच्या वर्षात हा स्मार्टफोन बाजारात येण्याची शक्यता आहे. हार्डवेअरमध्ये फेसबुकला गुगल या बलाढ्य सर्च इंजिन उद्योगाशी स्पर्धा करावी लागणार आहे कारण गुगलने नुकतीच मोटोरोला मोबिलीटी कंपनी साडेबारा बिलीयन डॉलर्सला खरेदी केली आहे.
 
फेसबुकने गेल्याच पंधरवड्यात नॅसडॅक स्टॉक मार्केटमध्ये एन्ट्री केली असून मोबाईल अॅपस स्टोअरही उघडले आहे. सध्या अॅपल आयओएस व गुगलच्या अॅड्रोईडवरून फेसबुक अॅपस लिंक्स उपलब्ध आहेत त्याऐवजी त्या फक्त फेसबुक अॅपसवरूनच उपलब्ध व्हाव्यात असाही प्रयत्न केला जात आहे.

फेसबुकने २०१० सालात त्यांचा पहिला स्मार्टफोन बाजारात आणण्याचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर तैवानी कंपनी एसटीसी तर्फेही स्मार्टफोनसाठी प्रयत्न केला गेला होता. मात्र आता हा तिसरा प्रयत्न अतिशय गंभीरपणे केला जात असून कंपनीचा प्रमुख मार्क झुकेरबर्ग यालाही आपल्या कंपनीचा स्मार्टफोन लवकरात लवकर बाजारात आणण्याची घाई आहे. अर्थात हा प्रयत्न फसू नये यासाठी मोबाईल संदर्भातील सर्व विभागाच्या तज्ञांचे मत विचारात घेतले जात असून अन्य स्मार्टफोनच्या तुलनेत हा स्मार्टफोन अधिक आकर्षक असावा यासाठी ही निर्मिती प्रक्रिया गुप्त ठेवण्यात आली असल्याचेही समजते.

Leave a Comment