रेल एशिया-२०१२ परिषद संपन्न

मुंबई, दि. २९ – देशात सध्या अनेक ठिकाणी ‘मेट्रो’ व ‘हाय स्पीड’ रेल्वे प्रकल्प आखले जात आहेत किंवा त्याबाबतचे प्रस्ताव सादर होत आहेत. हे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील, तेव्हा शहरी भागांतील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहराच बदलून गेलेला असेल, असा विश्‍वास सहाव्या ‘रेल एशिया-२०१२’ परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केला. मुंबईत नुकत्याच झालेल्या या परिषदेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो रेल प्रकल्पाचे तांत्रिक संचालक एस. पी. खाडे यांना विश्‍वेश्‍वरय्या कन्स्ट्रक्शन एक्सलन्स पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘सिटीट्रान्स इंजिनीअरिंग ऍण्ड सिस्टिम्स’, ‘ऍशकॉन मीडिया नेटवर्क्स’ व ‘कन्स्ट्रक्शन बिझनेस रेकॉर्डस्’ यांनी संयुक्तपणे ‘सार्वजनिक जलद वाहतूक यंत्रणा’ या विषयावर परिषद भरविली होती. या परिषदेत ‘मेट्रो’ चे नियोजन व बांधकाम, अर्थसाहय सुरक्षितता, ‘हायस्पीड रेल’, ‘लाईट रेल’ व ‘मोनोरेल’ अशा विविध विषयांवर चर्चा झाली. ‘ एमएमआरडीए’ च्या माहिती व दळणवळण खात्याने प्रमुख पी. आर. के. मूर्ती यांनी यावेळी ‘ मेट्रो’ व ‘ मोनो’ साठी अर्थसहाय्य मिळविण्याचे विविध मार्ग सुचविले. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे मुख्य अभियंता राजन कटारिया यांनी या प्रकल्पासाठी बांधलेल्या पुलांची वैशिष्टये सांगितली.

‘एमएमआरडीए’ च्या सार्वजनिक जलद वाहतूक यंत्रणा विभागाचे संचालक जी. आर. मदान यांनी देशातील मेट्रो प्रकल्पांच्या भविष्याचा वेध घेतला. ‘मोनोरेल’ प्रकल्पाचे संचालक विष्णुकुमार यांनी मुंबईत होत असलेल्या देशातील पहिल्या प्रकल्पात वापरण्यात येणार्‍या अभियांत्रिकी वैशिष्टयांची माहिती दिली. ‘मोनोरेल’ यंत्रणेचे संचलन व नियंत्रण कशा प्रकारे करावे याची माहिती अमेरिकेच्या ‘लुईस बर्जर’ चे प्रकल्प संचालक केनिथ मॅक्विन यांनी दिली. मोनो प्रकल्पासांठी जगभरात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती ‘मेसर्स स्कोमी इंजिनीअरिंग’ कंपनीचे भारतातील अध्यक्ष कानेसर यांनी दिली.