विक्रमादित्य राहुलचेही लाजविणारे यश

डोळ्यातील अंधारावर मात करीत जिद्दी आणि चिकटीच्या जोरावर बारावीच्या परीक्षेत विक्रमी यश मिळविणार्‍या राहूलने सार्‍यांची मने जिंकली. वाणिज्य शाखेत आतापर्यंतच्या इतिहासात कुणीही इतके गुण मिळवले नाही. त्याच्या या ऐतिहासिक यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राहुल हा डॉक्टरपुत्र आहे. दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात तो शिकतो. लहानपणापासूनच ९० टक्के आंधळा असणार्‍या राहूलने वाणिज्य शाखेत विक्रमी ९५ टक्के गुण मिळवून अंधारवाटेवर प्रकाशाची पेरणी केली.

विशेष असे की, यश संपादन करतांना राहुलने बारावीत ना पुस्तक पाहिले, ना वहीवर लिहिले. संगणकच त्याचा मित्र होता. संगणकावर स्क्रीन रीडर अप्लिकेशनच्या माध्यमातून त्याला वाचून दाखविले जात असे. तेच तो लक्षात ठेवायचा. राहुलने संगणकात पुस्तके डाऊनलोड केली होती. इंटरनेटचाही त्याला खूप आधार मिळाला. ठरावीक तास अभ्यास करण्यापेक्षा विषय पूर्णपणे समजून घेणे आणि त्यावर मंथन करणे हा राहुलच्या यशाचा मार्ग आहे. यावरच त्याने अखेरपर्यंत भर दिला. राहुलला एवढ्या मोठ्या यशाची अजिबात अपेक्षा नव्हती. परंतु त्याला आपल्या परिश्रमावर विश्‍वास होता. राहुलला आता लॉ मध्ये करिअर करायचे आहे. राहुलचे यश केवळ आताचे नाही, तर बी. आर.ए. मुंडले शाळेत दहावीत असताना ९७ टक्के गुण त्याने मिळवले होते.

Leave a Comment