पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्यावर ३ जून रोजी निर्णय ˆ- मुख्यमंत्री

पुणे, दि. २९  – पेट्रोलवरील व्हॅटसंदर्भात मंत्रिमंडळामध्ये चर्चा सुरू आहे. याविषयी तीन जूनपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पेट्रोलच्या दरात लिटरमागे साडेसात रुपयांनी वाढ झाल्यामुळे भडका उडाला आहे. त्यातून दिलासा देण्यासाठी गोवा, तमिळनाडू आणि उत्तराखंड या राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट रद्द केला आहे. याचे अनुकरण करीत कॉंग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट रद्द करण्याची सूचना कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी केली होती. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि विकास कामांसाठी पैसा आवश्यक असल्याने व्हॅट रद्द करता येणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी घेतली होती. या भूमिकेपासून मुख्यमंत्री आता दोन पावले मागे आल्याचे स्पष्ट झाले आहे.  

पेट्रोलवरील व्हॅट रद्द करण्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, व्हॅट रद्द करण्यासंदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये याविषयी चर्चा सुरू आहे. मात्र, व्हॅट रद्द करण्याचा विचार करण्यात येत आहे. याविषयी तीन तारखेपर्यंत निर्णयाची शक्यता आहे.
जलसंपदा विभागाची श्‍वेतपत्रिका काढण्याचा निर्णय हा कुणाला लक्ष्य करण्यासाठी नाही. तर, मागील चुकांपासून धडा घेत सुधारणा घडवून आणण्यासाठी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी चुकीची आहे की प्रिटिंग मिस्टेक आहे, गेल्या काही वर्षांत सिंचनावर नेमका किती खर्च झाला, त्यातून प्रत्यक्षात किती सिंचन झाले ही माहिती श्‍वेतपत्रिकेतून पुढे येणार आहे. मागील चुकांतून नवे धडे गिरविण्यासाठीच श्‍वेतपत्रिका काढण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये कुणाला टार्गेट करण्याचा उद्देश नाही.

राज्यामध्ये ७६ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. पण, राज्याचे बजेट सात ते आठ हजार कोटी रुपयांचे आहे. एकाच वेळी सर्व विकासकामांना निधी द्यायचा ठरवले तर, कोणतेच काम पूर्णत्वास जाऊ शकणार नाही. त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून उपाययोजना कराव्या लागणार आहेत. पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागणार आहेत, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. हे पाणी शेती, उद्योग आणि व्यापारासाठी वापरू नयेत, असे निर्देश दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment