ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी प्रकाशभाई मोहाडीकर कालवश

मुंबई, दि. १९ – साने गुरूजी यांचे शिष्य व स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार प्रकाशभाई मोहाडीकर यांचे शनिवारी पहाटे दादर येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी ते ९४ वर्षांचे होते. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव दादर मधील सानेगुरूजी विद्यालयात ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे, निकटवर्त्तीयांनी सांगितले.
    शिक्षक मतदार संघातून १९६७ साली विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडले जाण्यापूर्वी ते १९६२ मध्ये बृहन्मुंबई महापालिकेचे नगरसेवक होते. महापालिकेतही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. साने गुरूजी कथामालेला राज्यभर रूजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ध्येयवादी नेते असणारे प्रकाशभाई हे सेवादल चळवळीचे आधारस्तंभ होते. राजकारण, समाजकारण, साहित्य अशा सर्वच क्षेत्रांत त्यांचा लिलया वावर होता. वयाच्या ९१ व्या वर्षी विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) पदवीकरीता त्यांनी अभ्यास करण्यास सुरूवात केली होती.