भाषा जतनासाठी सामान्यांनीही पुढाकार घेणे गरजेचे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे मत

पुणे, दि. १९ – भाषेच्या वापरामध्ये राजकारण वाढले आहे. इंग्रजी भाषा येत नसेल तर, आपल्यामध्ये उणीव आहे, असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे. आपल्या मातृभाषेचे महत्त्व आपणच विसरत चाललो आहोत, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली.
    विश्‍व साहित्य कलावर्धिनी आणि प्रगती प्रकाशनतर्फे सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या हस्ते भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कवयित्री डॉ. रंजना फडके यांच्या चरित्रात्मक कादंबरी या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते यावेळी झाले.
    डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले,  भाषा नावाच्या गोष्टीचे भान विसरत चालल्यामुळेच भाषेसंदर्भातील प्रश्‍न निर्माण झाले आहेत. लोकभाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी प्रयत्न तर झालेच पाहिजेत; पण भाषेच्या जतनासाठी शासनाबरोबरच सामान्यांनाही पुढाकार घेणे गरजेचे आहे. न्यायालयासह अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. मात्र, तेथील कामकाज इंग्रजीत सुरू असते.
विद्या बाळ म्हणाल्या, विविध क्षेत्रांतील महिलांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे महिलांची विचार करण्याची शक्ती आणि इच्छा यावर प्रतिकूल परिणाम होताना दिसून येत आहे.
    डॉ. मंदा खांडगे, घनश्याम पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ. रंजना फडके यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.  

Leave a Comment