अकोला, दि. १९ – पत्रकार संरक्षण कायद्याविषयी स्थापन करण्यात आलेल्या समितीने पत्रकारांना संरक्षण दिलेच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली होती. सरकार आजही त्याच भूमिकेवर ठाम असून, लवकरच पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात येईल, अशी हमी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. ते आयोजित बहुजन पत्रकार संघटनेच्या विभागीय अधिवेशनात बोलत होते. यावेळी अधिवेशनाला विधान परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके उपस्थित होते.
तर व्यासपीठावर बहुजन पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील, विभागीय अध्यक्ष अनिल माहोरे, जिल्हाध्यक्ष ऍड. सुधाकर खुमकर यांची उपस्थिती होती. यावेळी पुरके म्हणाले की, ग्रामीण समाजाला तसेच आदिवासी समाजाला न्याय द्यायचा असेल तर बहुजन पत्रकार संघटनांच्या पाठीवर हात ठेवला पाहिजे. त्यामुळे पत्रकारांना आता संरक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गृहमंत्री पाटील म्हणाले की, पत्रकारांना संरक्षणाची गरज तर आहेच मात्र त्यांना आज घटकेला त्यांच्या मालकांपासूनच संरक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले. त्यासाठी पत्रकारांनी लढा उभारावा. अनेक लोक राजकारणाचा धंदा म्हणून उपयोग करतात. मात्र वर्तमानपत्र चळवळ मूल्य राबवित असल्याचे ते म्हणाले. यावेळी अधिवेशनाला ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, दिलीप एडतकर, प्रमोद चंचुवार, दिलीप भोयर, सोमनाथ सावळे, राजू पिसे आदी उपस्थित होते.
