राज्यात ई-महाभूमी योजना राबविणार – थोरात

पुणे, दि. १७ – राज्यातील भूमीअभिलेख शंभर वर्षापेक्षा जुने झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आधुनिक, सर्वंकष आणि पारदर्शक भूमिअभिलेख व्यवस्थापन पद्धती तयार करण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘ई-महाभूमी’ हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरूवारी येथे दिली.
    पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने बाळासाहेब थोरात यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. थोरात म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभिलेखाचे आधुनिकीकरण आणि व्यवस्थापन करण्यात येणार आहे. ‘ई-महाभूमी’ अंतर्गत ई-पुर्नमोजणी, ई-फेरफार, ई-चावडी, ई-अभिलेख आदी सुमारे आठ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती थोरात आणि चंद्रकांत दळवी यांनी यावेळी दिली.