शाहिद होणार आता होस्ट

    करीना कपूर सोबतचे प्रेमप्रकरण बिनसल्यानंतर आता कुठे शाहिद कपूरची गाडी रूळावर आली आहे. त्यासाठी त्याचे वडिल पंकज कपूरलाही बरेचसे कष्ट घ्यावे लागले. होम प्रोडक्शनचा ‘मौसम’ हा चित्रपट चांगला चालल्याने शाहिदची वेगळी ओळख झाली आहे.
    इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (आईफा) च्या १३ व्या पुरस्कार वितरण सोहळ्यात होस्ट म्हणून शाहीद कपूर काम करणार आहे. त्याच्यासोबत या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील सोनाक्षी सिन्हा व बिपाशा बासू या अभिनेत्री यावेळी परफॉर्म करणार आहेत. ७ जून रोजी मुंबई येथे आईफाचा कार्यक्रम आयोजित केला असून, गेल्या काही दिवसांपासून त्याची तयारी जोमाने सुरू आहे.
    यापूर्वी होस्ट म्हणून शाहिद कपूरला तसा फारसा अनुभव नाही. त्यामुळेच त्याने थोडेसे वेगळे काम करण्यासाठी होस्ट होण्याची तयारी केली आहे. या कार्यक्रमासाठी कोरिओग्राफर म्हणून प्रभू देवा काम पहात आहे. त्यासोबतच गायक मिका हा यावेळी परफार्मस सादर करणार आहे.
    शाहिद कपूरने यावेळी होस्ट म्हणून काम करीत असताना सहकारी कलाकाराला टार्गेट करणार नसल्याचे स्पष्ट केले. तर अनेकजण एकमेकांचे उणे-दुणे काढण्यातच धन्यता मानतात. यापूर्वी रितेश देशमुखने होस्ट म्हणून काम करताना सहकारी कलाकाराची टिंगल टवाळी केली होती. त्यामुळे आईफाचा कार्यक्रम चांगलाच सर्वांच्या आठवणीत राहिला होता.

Leave a Comment