एवढा त्रागा कशासाठी ?

     संसदेचा साठावा वर्धापनदिन कालच साजरा झाला. सांसदीय कामकाजाबाबत संसद सदस्यांनी काही चिंतन केले. त्यानंतर दोनच दिवसांनी राज्यसभेत गृह मंत्री पी. चिदंबरम यांच्यावर काही आरोप होताच त्यांनी असा काही विचित्र त्रागा केला की हा त्रागाच एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदला जावा. भाजपाचे नेते अरुण जेटली यांनी चिदंबरम यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि त्याला एक सौदा स्वस्तात पडावा म्हणून सरकारने काही गोष्टी केल्या असे नमूद केले. पण चिदंबरम यांनी या आरोपाला समर्पक उत्तर दिले नाही.  आपल्यावर असा काही आरोप करण्यापेक्षा आपल्या छाताडात एखादा सुरा खुपसा असे ते वैतागाने म्हणाले. या प्रकाराचे सगळे पैलू तपासून पाहण्याअगोदर या ‘एपिसोड’ मधील एक घटना सर्वांच्या नजरेस आणून द्यावीशी वाटते. चिदंबरम यांच्यावर हा आरोप होताच अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी हे आरोप खोटे आहेत असा खुलासा केला. केवळ राज्यसभेतच नाही तर संसदेच्या दोन्ही सभागृहात केला. काल संसदेने एक  नाट्यमय प्रसंग अनुभवला. चिदंबरम यांच्या रक्षणास प्रणव मुखर्जी सरसावलेले दिसले. गेले वर्षी प्रणव मुखर्जी चिदंबरम यांच्यावर २ जी स्पेक्ट्रम प्रकरणात आरोप करीत होते. हे प्रकरण घडताना चिदंबरम अर्थमंत्री होते आणि त्यांनी मनावर घेतले असते तर ते २ जी स्पेक्ट्रम घोटाळा टाळू शकले असते असे मुखजीं यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून कळवले होते. त्यातून मुखर्जी आणि चिदंबरम यांच्यातला संघर्ष विकोपाला गेला होता. प्रणव मुखर्जी अर्थ खात्यातला काही पत्रव्यवहार उघड करून आपल्याला उघडे पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत असा संशय चिदंबरम यांना होता आणि नेमके काय घडत आहे यावर नजर ठेवण्यासाठी त्यांनी अर्थ खात्यात हेरगिरीचाही प्रयत्न केला होता. लोकांना यातून घडलेले च्युइंगम प्रकरण आठवतच असेल. या दोघांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी होत असे, तिच्याही बातम्या माध्यमांत येत असत. या दोन नेत्यांत पंतप्रधानपदावरून हा सूप्त संघर्ष चाललेला होता आणि दोघेही परस्परांना भ्रष्ट किंवा अकार्यक्षम ठरवण्याचा प्रयत्न करीत होते. आता मात्र प्रणवदा चिदंबरम यांच्या मदतीला धावून आले. कारण पंतप्रधानपदाची स्पर्धा संपली आहे. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होणार आहेत. चिदंबरम यांच्यावर जेटली यांनी केलेला आरोप काही फार मोठा नव्हता. मागे तर त्यांना २ जी स्पेक्ट्रम प्रकरणात ए. राजा यांच्या बरोबरीचा आरोपी करण्याचा प्रयत्न झाला. एवढा गंभीर आरोप होऊनही त्यांनी कधी त्रागा केला नाही. मग आताच असा त्रागा का ? खरे तर त्यांचा मूड आता चांगला असायला हवा. कारण त्यांना हवे असलेले अर्थमंत्रिपद प्रणवदांच्या राष्ट्रपतीपदामुळे त्यांच्या आवाक्यात आले आहे  पण नाही. संसदेत आजवर अनेकांवर अनेक प्रकारचे आरोप झाले आहेत. कोणताही आरोप झाला तरी त्याला उत्तर कसे द्यायचे असते हे चिदंबरम यांच्यासारख्या नामवंत वकिलाला सांगण्याची गरज नाही. आरोप होतच असतो. तो खरा तरी असतो किंवा खोटा तरी असतो. मग तो खोटा असेल तर तो खोडून काढण्याची संधी उपलब्ध असते. तिचा फायदा घेऊन तो आरोप पुराव्यानिशी खोडून काढला पाहिजे. फारच राग आला तर बचावाचे आणखीही काही प्रकार आहेत. आरोप करणारांचा हेतू राजकीय आहे अशा हेत्वारोप करून आरोप उडवून लावता येतो. वाटेल त्या चौकशीला तोंड देण्यास तयार आहे असे स्पष्टपणे म्हणून निरपराधी असल्याचा आत्मविश्‍वास प्रकट करता येतो. काही वेळा काही नेते आपल्यावर झालेल्या आरोपाला उत्तर देताना, आरोप खरा ठरल्यास राजकारणातून निवृत्त होईन असे प्रति आव्हानही देतात. आरोपाने बदनामी होते. पण संदस्य सदस्यांना संसदेत काढलेल्या उद्गारावरून न्यायालयात खेचता येत नाही. ते संरक्षण त्यांना असते. त्याचा गैरवापर करूनही काही सदस्य आरोप करीत असतात अशा वेळी ज्याच्यावर आरोप असतील तो नेता, हिंमत असेल तर हेच आरोप सदनाच्या बाहेर करून दाखवा मग पाहतो असेही आव्हान देतात. पण चिदंबरम यांचे भलतेच. त्यांनी, असला काही संसदीय मार्ग अवलंबण्याऐवजी भावनिक आवाहनाचा मार्ग अवलंबिला. अर्थात त्यांच्या या आवाहनामुळे अरुण जेटली काही विचलित झालेले नाहीत. त्यांनीही संयमित उत्तर देताना, आपल्याला कोणा व्यक्तीच्या काळजात सुरा वगैरे खुपसण्यात काही रस नाही. सरकारचा कारभार आणि मंत्र्यांचे व्यवहार पारदर्शक आणि स्वच्छ असावेत यातच रस आहे असे उत्तर देऊन आरोपाच्या तपशीलाकडे पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधले. सरकारने  प्रणव मुखर्जी यांच्या खुलाशाला पी. चिदंबरम यांच्या भावनेची ही फोडणी दिली असली तरी जेटली यांचे समाधान झालेले नाही. त्यांनी या प्रकरणात आणखीही काही शंका उपस्थित केल्याच आहेत. पी. चिदंबरम कॉंग्रेसचे नेते आहेत. या पक्षात येतानाच लोकांना  गेंड्याची कातडी पांघरूण यायला सांगितलेले असते. कदाचित पी. चिदंबरम यांनीही ते कातडे घेतलेही असेल पण काल ते पांघरूण संसदेत आणण्यास ते विसरले असावेत असे दिसते.

Leave a Comment