दिल्ली बेल्ली, विकी डोनर – तामीळ रिमेक सिद्धार्थ करणार

दोन हिंदी सिनेमांचे दक्षिणेकडे रिमेक बनणार असल्याच्या दोन वेगवेगळ्या बातम्या सध्या गाजताहेत. पहिली बातमी आमिर खानच्या होम प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या ‘दिल्ली बेल्ली’ या सिनेमाबाबत आहे. तामिळ भाषेत या सिनेमाचा रिमेक बनवला जात असून,  मे पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. ‘दिल्ली बेल्ली’च्या तामिळ रिमेकचे दिग्दर्शन आर. कानन करीत आहेत. ‘दिल्ली बेल्ली’मध्ये इमरान खानने साकारलेली भूमिका तामिळ चित्रपटात आर्य साकारत आहे. कुणालने साकारलेल्या भूमिकेत तामिळ चित्रपटातील विनोदी अभिनेता संतथम, तर वीर दासच्या भूमिकेत प्रेमगी दिसेल. हंसिका मोटवानी आणि अंजली यात मुख्य नायिकेच्या रूपात चमकतील. यादरम्यान आणखी एका हिंदी चित्रपटाचे हक्क दक्षिणेकडे रिमेक करण्यासाठी खरेदी करण्यात आल्याची बातमी आहे. जॉन अब्राहमच्या होम प्रॉडक्शनमध्ये बनलेला ‘विकी डोनर’ चित्रपट तामिळ भाषेत रिमेक करण्यासाठी सिद्धार्थने  हक्क खरेदी केले आहेत. सिद्धार्थने यापूर्वी राकेश मेहराच्या रंग दे बसंतीमध्ये अभिनय केला होता. विकी डोनरमध्ये आयुष्मान खुरानाने साकारलेली भूमिका सिद्धार्थ स्वतः साकारणार आहे. इतर कलाकारांची निवड अद्याप व्हायची असल्याचे समजते. सप्टेंबर महिन्यात या सिनेमाच्या चित्रीकरणाला प्रारंभ होईल, अशी आशा आहे.

Leave a Comment