
आयपीएलच्या चार सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या माध्यमातून सदैव दबदबा राखणार्या महेंद्रसिंग धोनीचा करिष्मा यावेळेसच्या सीझनमध्ये मात्र गायब झाला आहे. २० ट्वेंटी स्पर्धेचे विश्वविजेतेपद त्यानंतर विश्वचषक जिंकणारा कर्णधार म्हणून अल्पावधीतच धोनीने मोठे नाव कमवले. त्याचप्रमाणे आयपीएल स्पर्धेत सुद्धा गेल्या चार सीझनमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली तर दोन वेळा विजेतेपद पटकावले होते.
गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय संघाचा कर्णधार म्हणूनही धोनीची कामगिरी निराशाजनक झाली आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया दौर्यात भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला. एवढेच नव्हे तर कसोटी क्रमवारीतले भारताने पटकावलेले अव्वल स्थानही इंग्लंड संघाने दिलेल्या व्हॉईट वॉशमुळे गमवावे लागले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौर्यावरही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. काही दिवसांपूर्वीच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत बांगला देशाने पराभूत केल्याने आशिया चषकाच्या फायनलपर्यंतही भारतीय संघाला मजल मारता आली नाही. या सर्व सामन्यातून धोनीची कर्णधार म्हणून कामगिरी निराशाजनकच झाली.
आयपीएलच्या पाचव्या सिझनमध्ये तर ही पराभवाची मालिका खंडीत करून धोनी काहीतरी चमत्कार करून दाखवेल असे वाटत होते. मात्र ते काही त्याला या स्पर्धेत जमेल असे वाटत नाही. सेहवागची कामगिरी निराशाजनक झाल्याने त्याचे उपकर्णधारकपद काढून घेण्यात आले. मात्र त्यातूनही धोनीला संधी देण्यात आली होती. गेल्या काही दिवसांतील धोनीची कामगिरी पाहता त्याची जादू ओसरली आहे असे वाटते.
