
पुणे, दि. ११ – श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा सदस्य मोहंमद कतिल मोहंमद जफिर सिद्दिकीने ती सर्व ठिकाणे पोलिसांना दाखविली आहेत. ज्या फूल विक्रेत्याकडे बॉम्ब असलेली बॅग ठेवण्याचा प्रयत्न केला होता, त्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान, सिद्दिकीला २१ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिला.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्बस्फोट घडविण्याच्या प्रयत्न सिद्दिकी याने केला होता. दहशतवाद विरोधी पथकाने त्याला बिहार येथून दोन मे रोजी अटक केली होती. सिद्दिकी याच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपुष्टात आल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी यासीन अहमद सिद्दीबाप्पा उर्फ यासीन भटकल उर्फ इम्रान आणि त्याचे अन्य साथीदार पोलिसांना हवे आहेत. दरम्यान पोलीस कोठडी वेळी केलेल्या तपासात त्याने काही ठिकाणे पोलिसांना दाखविली आहेत. तो ज्या घरामध्ये राहात होता, ते घर, ज्या मार्गाने तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात येत होता तो मार्ग, ज्या फूल विक्रेत्याकडे बॉम्ब ठेवण्यापूर्वी रेकी करण्याच्या उद्देशाने बॅग ठेवली होती आणि १३ फेब्रुवारी २०१२ रोजी बॉम्ब असलेली बॅग ठेवण्याचा प्रयत्न केला होता, ही सर्व ठिकाणे त्याने दाखविली आहेत. भाडेतत्त्वावर तो राहात असलेल्या ठिकाणच्या संबंधितांचेही जाब-जबाब नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय फुल विक्रेत्यांचेही जाब-जबाब घेण्यात आले आहेत. सिद्दिकी याने त्याचा साथीदार यासीन भटकळ यांनी बॉम्ब बनविल्याचे आणि त्यासाठी त्यांनी मोबाईलचा वापर केल्याचेही तपासत स्पष्ट झाले आहे. बॉम्ब ठेवलेली बॅग मुंबई येथे नेऊन ती समुद्रात टाकल्याचेही सिद्दीकी पोलिसांना सांगत आहे. बॅग आणि बॉम्बसाठी वापरलेला मोबाईल कोठून विकत घेतला, याचाही तपास झाला असून या प्रकारानंतर दिल्ली येथे तो यासीन भटकळ याच्याबरोबर गेल्याचेही पोलिसांना सांगत आहे.
दरम्यान, त्याला २१ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतर बॉम्बची बॅग घेऊन गेलेल्या गाडीचा तपास करायचा असून, प्रवासादरम्यान तो कोणत्या ठिकाणी राहिला होता याचा तपास करायचा आहे. इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा तो सदस्य असल्याचेही निष्पन्न झाले असून त्याचबरोबर त्याचे लष्कर-ए-तोयबाचे काही सदस्यही साथीदार विविध ठिकाणी वास्तव्यास असल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे. सिद्दिकी पुण्यात वास्तव्यास असताना तो घरामध्ये न थांबता बाहेर जात होता. तसेच रात्री-अपरात्रीही तो परत येत असल्याचे साक्षीदारांनी सांगितले. त्यामुळे तो नक्की आणि कोणत्या ठिकाणी साथीदारांना भेटण्यासाठी जात होता, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.
