‘आय टी’ कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ

मुंबई, दि. १० – माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या ५ कंपन्यांच्या महसूलात २३.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. यात व्हॉग्निझंट या कंपनीच्या व्यवसायात सर्वाधिक ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
    देशातील आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या सेवा आणि उत्पादनांना जागतिक बाजारात मोठी मागणी आहे. २०११ मध्ये यातील आघाडीच्या ५ कंपन्यांनी चांगली कामगिरी केली असून, त्यांच्या एकूण उत्पन्नात सरासरी २३.८ टक्के वाढ झाली असल्याचे गार्टनर या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. याच वर्षात आंतरराष्ट्रीय आयटी सेवांमध्ये ७.७ टक्क्यांची वाढ झाली. नॅसडॅक शेअरबाजारात नोंदणीकृत असलेल्या कॉग्निझंटने देशातील ‘आयटी‘चा महसूल वाढविण्यास हातभार लावला.
    कॉग्निझंटच्या व्यवसायात ३३ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी तब्बल ७५ टक्के कर्मचारी भारतात काम करतात. तसेच या कंपनीने नुकतेच विप्रोला मागे टाकत ‘आयटी‘ सेवा देणारी तिसरी मोठी कंपनी असल्याचा बहुमान मिळविला आहे. एकीकडे एकट्या आयटी कंपन्यांना अमेरिका व युरोपात व्यवसाय वाढविताना अनेक अडचणी येत आहेत. मात्र, कंपन्यांचा संघ म्हणून आयटी कंपन्यांनी चांगली कामगिरी केली असल्याचे गार्टनरचे प्रमुख संशोधक अरुप रॉय यांनी सांगितले.
    या कंपन्यांनी अमेरिका व यूरोपातील आयटी क्षेत्रातील आपली हिस्सेदारी २.८ टक्क्यांपर्यंत वाढविली आहे. कॉग्निझंट खालोखाल ‘टीसीएस‘च्या महसूलात २९.४ टक्क्यांची वाढ झाली. तसेच इन्फोसिसचे उत्पन्न १७.८ टक्क्यांनी वाढले. लहान ‘आयटी’ कंपन्यांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. आघाडीच्या ५ कंपन्यांव्यतिरिक्त गेनपॅक्टच्या महसूलात २७ टक्के व सिटेलमध्ये २१ टक्के वाढ झाली.
  गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका व यूरोपातून देशातील आयटी कंपन्यांना मोठया प्रमाणात नवीन कंत्राटे मिळाली आहेत. या क्षेत्रातून मिळणार्‍या कंत्राटांचा आकडा १० कोटी  डॉलरवर गेला आहे.

Leave a Comment