अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिष्यवृत्तीसाठी पालकांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ

मुंबई, दि.११ –  अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी लागू असलेल्या शिष्यवृत्ती योजनेत असलेली विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आता ४ लाख ५० हजार रूपये इतक्या रक्कमेपर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
    अनुसूचित जमातीच्या मुला, मुलींना परदेशात शिक्षणाची संधी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून, परदेशातील शिक्षणाकरिता परदेशी नामांकित विद्यापीठांमध्ये १० अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती योजना ३१ मार्च २००५ या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा २.५० लाख रूपये ठरविण्यात आली होती. ही मर्यादा कमी असल्याने या योजनेचा लक्षांक पूर्ण होण्याच्या दृष्टीने अपेक्षित मर्यादा वाढविण्यात आली आहे.