अंध वकील चेन गुंगचेंगच्या कुटुंबियांवर चीनी पोलिसांची बंधने कडक

बिजिग दि.११- अंध वकील व सामाजिक कार्यकर्ते चेन गुंगचेंग यांच्या कुटुंबियांवर स्थानिक पोलिस व चीन सरकारने अनेक बंधने घातली असून कांही जणांना स्थानबद्द करण्यात आले आहे असा आरोप चेन यांनी केला आहे.
   सामाजिक कायर्कर्ते चेन यांनी स्थानबद्धतेतून निसटून स्वतःची सुटका करून अमेरिकी दूतावासात आश्रय घेतला होता. त्यावर चीन सरकार आणि अमेरिका यांच्यात चर्चा होऊन चेन यांना कुटुंबियांसह अमेरिकेत स्थलांतरीत होण्याची परवानगी चीन सरकारने अमेरिकेबरोबर केलेल्या करारात दिली होती. मात्र या घटनेने स्थानिक अधिकार्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून चीन सरकारही कांहीसे कोंडीत सापडले आहे.चेन सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र त्यांच्या गावातील त्यांचे पुतणे, बंधू, वहिनी, काकू यांना स्थानिक अधिकारी त्रास देत असून बंधू व वहिनीला स्थानबद्ध करण्यात आले आहे तर पुतण्याला वादावादी झाल्याचे कारण सांगून तुरूंगात टाकण्यात आले असल्याचे चेन यांचे म्हणणे आहे. सर्व नातेवाईकांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात येत असून सर्वांवर कांही ना कांही बंधने घातली गेली असल्याचेही ते म्हणाले. शांगडोंग हे त्यांचे गांव असून या गावात त्यांच्या भेटीसाठी कोणाही वकीलाला येऊ दिले जात नाही तसेच नातेवाईकांनाही बाहेर जाऊन वकीलाला भेटता येत नाही असे सांगून चेन म्हणाले की चीन सरकार माझ्यावर सूड घेत असून त्याचा त्रास माझ्या कुटुंबियांना भोगावा लागतो आहे.